satheesh babu

मल्याळम लेखक सतीश पायनूर (Satheesh Babu Payyanur) यांचं आज निधन झालं आहे.

  मल्याळम (Malayalam) लेखक सतीश बाबू पायनूर (Satheesh Babu Payyanur) यांचं आज निधन झालं आहे. ते ५९ वर्षांचे होते. सतीश यांचा मृतदेह हा त्यांच्या वांचियूर तिरुवनंतपुरम (Vanchiyoor, Thiruvananthapuram) येथील राहत्या घरी आढळला आहे.

  सतीश यांची पत्नी घराबाहेर गेल्याने ते घरात एकटेच होते. सतीश यांनी बराच वेळ फोन उचलला नाही. दार वाजवल्यानंतर घरातून काहीच आवाज आला नाही. त्यामुळे अखेर सतीश यांच्या घराचा दरवाजा तोडण्यात आला. घराचा दरवाजा तोडून आत गेल्यानंतर घरात सतीश यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. सतीश (Satheesh Babu Payyanur Death) यांच्या मृत्यूचं कारण अजून समोर आलेलं नाही.

  शवविच्छेदनानंतरच मृत्यूचं कारण समोर येईल. पोलिसांनी सतीश बाबू पायनूर यांचा मृतदेह तिरुअनंतपुरम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे.

  पलक्कड येथील पाथिरीपालामध्ये सतीश बाबू पायनूर यांचा जन्म झाला. त्यांनी कान्हागड आणि पयन्नूरमधून उच्च शिक्षण घेतले. सतीश बाबू पायनूर हे प्रसिद्ध लघुकथा लेखक आणि कादंबरीकार होते. मलयत्तूर पुरस्कार आणि थोपपिल रवी पुरस्कारानं देखील त्यांना गौरवण्यात आलं.

  मन्नू, दैवापुरा, मांजा सूर्यंते नलुकल आणि कुडामणिकल किलुंगिया रविल यासह अनेक कादंबर्‍यांचे ते लेखक आहेत. त्यांनी मलयत्तूर पुरस्कार आणि थोपपिल रवी पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्यांना २०१२ मध्ये केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. केरळ साहित्य अकादमी आणि केरळ राज्य चालचित्र अकादमीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

  केरळच्या सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत असलेल्या भारत भवन या संस्थेचे सदस्य सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सतीश बाबू यांनी अनेक डॉक्युमेंट्री बनवल्या आहेत तसेच त्यांनी १९९२ च्या नक्षत्रकूदरम चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.