
एकिकडे भारतात ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) हा चित्रपट कमाईचे रेकॉर्ड मोडत असताना दुसरीकडे एक दुःखद घटना घडली आहे. ‘अवतार २’ चित्रपट चित्रपटगृहामध्ये पाहत असताना एका प्रेक्षकाचं निधन झालं आहे.
‘अवतार २’ (Avatar 2) म्हणजेच ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) चित्रपट १६ डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. एकिकडे भारतात हा चित्रपट कमाईचे रेकॉर्ड मोडत असताना दुसरीकडे एक दुःखद घटना घडली आहे. ‘अवतार २’ चित्रपट चित्रपटगृहामध्ये पाहत असताना एका प्रेक्षकाचं निधन झालं आहे.
आंध्रप्रदेशमधील पेड्डापुरम शहरातील चित्रपटगृहामध्ये लक्ष्मीरेड्डी श्रीनू ‘अवतार २’ चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. त्याचवेळी एक दु:खद घटना घडली. चित्रपट पाहत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. चित्रपट पाहत असतानाच ते जागेवर कोसळले आणि चित्रपटगृहामध्येच श्रीनू यांचं निधन झालं. श्रीनू त्यांचे भाऊ राजूसह चित्रपट पाहण्यासाठी आले होते. श्रीनू यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लगेचच राजू यांनी त्यांना रुग्णालयामध्ये नेलं. मात्र रुग्णालयामध्ये उपचार करण्यापूर्वीच श्रीनू यांचं निधन झालं. त्यांच्या मागे मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
याआधी २०१०मध्ये ‘अवतार’चा पहिला भाग प्रदर्शित झाला. पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतरही अशीच घटना घडली होती. त्यावेळी तैवानमध्ये ‘अवतार’चा पहिला भाग पाहत असताना ४२वर्षीय व्यक्तीचं हृदयविकारामुळे निधन झालं होतं.
दरम्यान काही हजार स्क्रीन्सवर भारतात प्रदर्शित झालेल्या ‘अवतार २’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४० कोटींचा गल्ला जमवला. ‘अवतार २’चा हा रेकॉर्ड बघता लवकरच हा चित्रपट १०० कोटींचा आकडा पार करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. चित्रपटाचे देशातील सगळे शो हाऊसफुल होत आहेत. याआधी २००९ साली आलेल्या ‘अवतार’ने सर्वाधिक कमाईचा इतिहास रचला होता. एक अद्भुत विश्व या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळालं होतं. आता तब्बल १२ वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे आणखी ३ भाग येणार आहेत.