प्रेक्षक अनुभवणार ‘पुन्हा बालपण’ ‘मायलेक’मधील बहारदार गाणे प्रदर्शित!

या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

    आई आणि मुलीच्या सुंदर नात्यावर भाष्य करणारा ‘मायलेक’ (Maylek) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटातील एक बहारदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रत्येकाला आपल्या बालपणात घेऊन जाणाऱ्या या गाण्याचे बोल ‘पुन्हा बालपण’ असे आहेत. पंकज पडघन यांनी गायलेल्या या सुरेल गाण्याला नेहा आदर्श शिंदे यांची साथ लाभली आहे. तर क्षितिज पटवर्धन यांचे भावपूर्ण शब्द लाभलेल्या या गाण्याला संगीत पंकज पडघन यांनीच दिले आहे. हे गाणे सोनाली खरे, उमेश कामत यांच्यावर चित्रीत झाले असून हे गाणे ऐकायला जितके श्रवणीय आहे तितकेच पाहायलाही सुखद आहे.

    ब्लुमिंग लोटस प्रॉडक्शन, सोनाली सराओगी प्रस्तुत ‘मायलेक’ हा चित्रपट येत्या १९ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोनाली आनंद निर्मित या चित्रपटाचे कल्पिता खरे, बिजय आनंद सहनिर्माते आहेत. तर नितीन प्रकाश प्रकाश वैद्य ‘मायलेक’चे असोसिएट प्रोड्युसर आहेत.

    गाण्याबद्दल सोनाली खरे म्हणते, ” आपल्या सर्वांनाच बालपणात घेऊन जाणारे, जुन्या दिवसांची आठवण करून देणारे हे गाणे आहे. या गाण्याचे बोल खूपच सुंदर आहेत. क्षितिजने अतिशय हळव्या पद्धतीने हे शब्द गुंफले आहेत. प्रत्येक कडव्यात एक भावना दडलेली आहे. नॅास्टेल्जिक बनवणारे हे गाणे धमाल, मजामस्तीने भरलेले आहे. खास माणसांच्या खास आठवणीत रमलेल्या प्रत्येकासाठी हे गाणे आहे.”