आई मुलीच्या सुंदर नात्याची कथा रुपेली पडद्यावर, ‘मायलेक’ चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस!

मायलेक चित्रपटांच नवं पोस्टर नुकतचं समोर आलं आहे. हा चित्रपट 19 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट तयार होत आहेत. बायोपिक, काॅमेडी, नातेसंबधावर आधारित चित्रपटांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या पंसतीस उतरतात. वडिला आणि मुलांच्या नात्यावरीलही चित्रपट यापुर्वी रुपेरी पडद्यावर आले आहेत. आता आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या’मायलेक’ चित्रपटाचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मायलेक (Maylek ) असं चित्रपटांच नाव असून त्याचं नवं पोस्टर नुकतचं समोर आलं आहे. या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने, महेश पटवर्धन, वंश अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 19 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  अभिनेत्री सोनाली खरे आणि तिची मुलगी मुख्य भुमिकेत

  या चित्रपटाच्या आई आणि मुलीच्या भुमिकेत अभिनेत्री सोनाली खरे आणि सनाया आनंद आहे. या निमित्ताने रिअलमधील मायलेक रीलमध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत. कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे निर्माते असून नितीन प्रकाश वैद्य असोसिएट प्रोड्यूसर आहेत.तर, प्रियांका तन्वरने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.

  आई मुलीच्या सुंदर नात्याची कथा

  चित्रपटाबद्दल सोनाली खरे म्हणाली की, ” आई मुलीच्या सुंदर नात्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यात प्रेमासोबत काही आंबट गोड क्षणही आहेत. प्रत्येक आईमुलीला हा चित्रपट जवळचा वाटेल. मुळात आम्ही खऱ्या मायलेकी असल्याने हे पडद्यावर खूप नैसर्गिकरित्या साकारता आले.’

  आई आणि मुलीचे नाते हे नेहमीच खास असतं. कधी त्या मैत्रिणी असतात, तर कधी त्यांच्यात रुसवे फुगवेही असतात. कधी मुलगी आई बनून आईला साथ देते. तर कधी आई मुलीच्या मागे खंबीरपणे उभी राहते. या नात्यातील अशीच अनोखी गंमत या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरमध्ये सोनाली खरे आणि सनाया आनंद यांच्या नात्यातील सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता यांचे नाते कसे असणार, हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.