ravan calling

‘रावण कॉलिंग’ या चित्रपटाच्या निमित्ताने नामवंत अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.

    श्री गजानन प्रॉडक्शन निर्मित ‘रावण कॉलिंग’ (Ravan Calling) या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मुहूर्ताचा पहिला क्लॅप दिला. संदीप दंडवते, संदीप बंकेश्वर आणि अभिषेक गुणाजी (Abhishek Gunaji) यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक गुणाजी आणि संदीप बंकेश्वर यांनी केले आहे. तर या चित्रपटाची सहायक पटकथा आणि संवाद सचिन दरेकर यांचे आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने नामवंत अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.

    ‘रावण कॅालिंग’मध्ये सचित पाटील, पूजा सावंत, वंदना गुप्ते, गौरव घाटणेकर, रवी काळे, बिपीन नाडकर्णी राजू शिसाटकर आणि सोनाली कुलकर्णी, मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या तरी हा चित्रपट कशावर आधारित आहे, याबाबत गोपनीयता असली तरी लवकरच या गोष्टी उलगडतील.

    चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अभिषेक गुणाजी म्हणतात, “यापूर्वी मी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. मात्र स्वतंत्र दिग्दर्शनाच्या कारकिर्दीतील हा माझा पहिला चित्रपट आहे, त्यामुळे उत्सुकता तर आहेच पण तितकेच दडपणही आहे. मुळात माझ्या नावाशी दोन मोठी नावे जोडली गेली आहेत, त्यामुळे माझ्यावर जबाबदारीही तितकीच आहे. माझ्या प्रोजेक्टला शंभर टक्के न्याय देण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल. या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात नुकतीच मुंबई मध्ये झाली असून लवकरच ‘रावण कॉलिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला येईल . सध्या तरी चित्रपटाबद्दल काहीच सांगू शकत नसलो तरी ‘रावण कॅालिंग’ अनेक ट्विस्टने भरलेला असेल. सगळेच कलाकार उत्तम आहेत. मला आशा आहे, जसे प्रेम तुम्ही माझ्या आई वडिलांना दिले तसेच प्रेम माझ्या पहिल्या चित्रपटालाही मिळेल. ”

    तर दिग्दर्शक संदीप बंकेश्वर म्हणतात, “चित्रपटाचा विषय खूप वेगळा आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की, ‘रावण कॉलिंग’च्या निमित्ताने मी अनेक नामवंत कलाकारांशी जोडलो गेलो आहे. या सगळ्याच कलाकारांची अभिनयाची एक विशिष्ट शैली आहे. त्यांच्यासोबत काम करताना मजा येणार हे नक्की. अभिषेकही कामाच्या बाबतीत अतिशय शिस्तप्रिय आहे. त्याच्या वडिलांचे आज बॉलिवूड, मराठी इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव आहे. परंतु कामाच्या बाबतीत त्यांचे नाते दिग्दर्शक – कलाकाराचेच आहे.”