अभिजात दर्जापेक्षा मराठी भाषा टिकण्यासाठी अधिक प्रयत्न करावे

आज मी एअरपोर्टपासून मराठी आणि हिंदीच्या सेटवर बिनधास्तपणे मराठीमध्ये बोलतो. मराठीत बोलताना मला अजिबात कमीपणा वाटत नाही.

  स्मिता मांजरेकर

  मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सरकारी पातळीपासून अनेक साहित्यिकांनी जोर धरला आहे. यावर आता मराठी कलावंतंदेखील व्यक्त होत आहेत. अभिनेता आणि लेखक हृषिकेश जोशी (Hrishikesh Joshi) यांनी देखील आपली रोखठोक मत ‘नवराष्ट्र’शी केलेल्या एक्सक्लुसिव्ह बातचीतमध्ये व्यक्त केली आहेत.
  मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा हवाय म्हणजे नक्की काय हवं आहे? असा प्रश्न मला पडतो आहे. सरकारी ठप्पा हवाय? आणि जरी सरकारी पातळीवर मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाला तरी काय होणार आहे? तर त्याला एक बजेट मंजूर होईल. पण याने मराठी भाषा टिकणार आहे का? माझं स्पष्ट मत आहे की, भाषा टिकणं जास्त महत्त्वाचं आहे आणि भाषा टिकवण्यासाठी 4 महत्त्वाचे घटक आहेत. शिक्षक, राजकीय नेते, माध्यमं, लोकनागरीक या सगळ्यांनी मिळून मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आज किती राजकीय नेते उत्कृष्ट मराठी बोलतात? तसंच आज माध्यमातली भाषा बरबटलेली आहे. काही अपवादात्मक वर्तमान पत्रातील भाषा त्यातल्या त्या बरी
  असते. तसंच शिक्षकांनाच जर चांगलं मराठी येतं नसेल तर मराठीचा दर्जा टिकणार नाही. मी स्वत: शिक्षक होतो. त्यामुळे याविषयी खूप काही बोलू शकतो. शिक्षकांची निवड प्रक्रियाच ही भाषा संपन्नतेपेक्षा इतर निकषांवर ठरवली जाते. शिक्षकांनाच किती भाषा चांगली येत? तर ते मुलांना शिकवतील असा प्रश्न मला पडतो. तसंच जाहिरातीमध्ये चुकीच्या पध्दतीने भाषांतर असतं. चुकीचं लिखाण, व्याकरणाचे नियम पाळले जात नाही. प्रमाण भाषा, शुध्द-अशुध्द आणि व्याकरण याबाबत खूप गैरसमज आहेत. त्याबाबत कोणाला काही पडलेलं नाही. तसंच इंग्रजी आलं पाहिजे नाहीतर आपली नाचक्की होईल असा समज दृढ होत चालला आहे. अशात मराठी भाषा आधी टिकवण्यासाठी धडपड
  करता आली पाहिजे.

  भाषेला अर्थकारण नाही
  मराठी भाषेला अभिजातचा दर्जा मिळाला तर मुळात मराठी भाषा टिकणार आहे का? हा माझा प्रश्न आहे. आपल्या मराठी भाषेला अर्थकारण नाही. साधं इंग्रजी पेपरची रद्दी 10 रु आणि मराठी पेपरची रद्दी 8 रु. ला मिळते. तिथे आपण काय बोलणार. मराठी अस्मिता वगैरे मला सारं काही खोटं वाटतं. तसंच आमच्या शिक्षणामध्येच मराठीचा क्रम दुसरा ठेवला आहे. रोजच्या जगण्यात मराठीचा क्रम शेवटच ठेवला आहे आणि आम्हाला अभिजातचा दर्जा हवाय?

  मराठीत बोलताना मला कमीपणा वाटत नाही
  आज मी एअरपोर्टपासून मराठी आणि हिंदीच्या सेटवर बिनधास्तपणे मराठीमध्ये बोलतो. मराठीत बोलताना मला अजिबात कमीपणा वाटत नाही. अनेक बॉलीवूड स्टार्सला मराठी येतं. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या कारकिर्दला 50 वर्षे झाले तेव्हा मी एका मराठी वृत्तपत्रात बिग बींवर लेख लिहला होता. माझ्याकडून अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) तो पेपर घेतला. मी त्याला याबाबत विचारलं तर तो म्हणाला की, माझ्या घरी रोज सगळेअर्धातास मराठी पेपर वाचतात. माझे वडील, अमिताभ बच्चन रात्री रोज मराठी पेपर वाचतात.

  मायमराठी उपजिवीकेचं साधन
  मराठी भाषा ही मराठी नाटकाचा सर्वात मोठं उपजिविकेचं साधन आहे. आज मराठीभाषेमुळेच मराठी रंगभूमी टिकली आहे. भरत जाधवपासून प्रशांत दामलेपर्यंत अनेक कलावंतांनी आपलं ऐश्वर्य उभं केलंय ते केवळ मराठी भाषेतील नाटकांमुळेच.