nagraj manjule

'मिर्झापूर-3' बाबत मोठी घोषणा होईल या प्रतिक्षेत असलेल्या प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राईमने मोठं गिफ्ट दिले आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या पहिल्या वेब सीरिजची आज घोषणा करण्यात आली.

    फॅन्ड्री, पिस्तुल्या, सैराट, नाळ यासारख्या दर्जेदार चित्रपटातून दिग्दर्शक नागराज मंजुळेने (Nagraj Manjule)  मराठी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. मोठा पडदा गाजवल्यानंतर आता हा मराठमोळा दिग्दर्शक आता ओटीटी विश्वात पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या पहिल्या वेब सीरिजची नुकतीचं घोषणा करण्यात आली. ‘मटका किंग’ (Matka King web series) असं या पहिल्या वाहिल्या वेब सीरिजचं नाव असून या वेब सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा (vijay varma) हा मुख्य भूमिकेत असणार आहे.

    मंगळवारी मुंबईत अॅमेझॉन प्राईमनं एका भव्य कार्यक्रमात एकाच वेळी अनेक वेबसीरीज आणि चित्रपटांची घोषणा करण्यात आली. यामध्ये नागराज मंजुळेच्या वेबसिरिजची घोषणा करण्यात आली. ‘मटका किंग’ या वेबसिरिजच्या माध्यमातून आता नागराज मंजुळे ओटीटी विश्व गाजवणार आहे. रॉय कपूर फिल्म्स, आटपाट आणि एसएमआर प्रॉडक्शनकडून निर्मिती करण्यात येत असून सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज मंजुळे, अश्विनी सिडवानी, आशिष आर्यन हे निर्माते आहेत. तर, अभय कोरणे आणि नागराज मंजुळे यांनी लेखन केले आहे.

    मटका किंगची कथा काय?

    अभिनेता विजय वर्मा यात मुख्य भूमिकेत असणार आहे. मुंबईतील कापसाचा एक व्यापारी कशाप्रकारे मटका जुगाराचा व्यवसाय चालवतो आणि त्यातून कशाप्रकारे आपले साम्राज्य उभारतो याभोवती वेब सीरिजची कथा आहे. मटका किंग रतन खत्रीच्या आयुष्यावर ही वेब सीरिज असल्याचे बोलले जात आहे. या वेब सीरिजमध्ये मुंबईतील 60-70 दशकातील चित्रण असणार आहे.