आव्हाडांनी संदर्भ दिलेला ‘अन्नपूर्णी’ चित्रपट नेटफ्लिक्सने हटवला, ‘या’ वक्तव्याने ठरतोय वादग्रस्त

जितेंद्र आव्हाड यांनी 'अन्नपूर्णी' चित्रपटाचा दाखल दिला होता. आता नेटफ्लिक्सने या चित्रपटावर कारवाई करत तो ओटीटीवरुन काढून टाकला आहे.

  मुंबई – दाक्षिणात्य सुपरस्टारने काम केलेला ‘अन्नपूर्णी’ चित्रपट (Annapoorani movie) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 1 डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 29 डिसेंबरला ‘अन्नपूर्णी’ चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता. यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा (Actress Nayanthara) हिने प्रमुख भूमिका साकारली आहे. मात्र चित्रपटामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात असून हा चित्रपट बंद करण्याची जोरदार मागणी केली जात होती. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील ‘अन्नपूर्णी’ चित्रपटाचा दाखल दिला होता. आता नेटफ्लिक्सने या चित्रपटावर कारवाई (Annapoorani Movie Controversy) करत तो ओटीटीवरुन काढून टाकला आहे.

  मागील अनेक दिवसांपासून ‘अन्नपूर्णी’ चित्रपटावर वादंग निर्माण झाला. या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली होती. शिवसेना नेते रमेश सोलंकी यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल केली . तसेच नेटफ्लिक्सच्या मुंबईतील ऑफिसबाहेर निदर्शनेही केली. त्यामुळे तातडीने कारवाई करत अन्नपूर्णा चित्रपटाला नेटफ्लिक्सने प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकला आहे.

  चित्रपटामध्ये काय आहे आक्षेपार्ह ?

  ‘अन्नपूर्णी’ या चित्रपटामध्ये हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री हिंदू असून हिंदू संस्कृतीचा अपमान करताना दाखवण्यात आली आहे. अभिनेत्रीचा मित्र फरहान तिचं ब्रेनवॉश करून तिच्याकडून मांस कापून घेतो. प्रभू श्रीराम आणि माता सीता हे सुद्धा मांसाहारी होते, असं तो तिला सांगतो. बिर्याणी बनवण्याआधी मंदिराच्या पुजाऱ्यांची मुलगी हिजाब घालून नमाज पठण करते. चित्रपटात अभिनेत्री मंदिरात न जाता फरहानच्या घरी रमजान इफ्तार करण्यासाठी जाते. तिचे वडील मंदिरात संध्या आरती करत असतात, आजी माळ जपत असते तेव्हाच अभिनेत्रीचं मांस खातानाचं आणि खाऊ घालतानाचे दृश्य दाखवण्यात आले आहे. अभिनेत्रीचे वडील एका मंदिराचे प्रधान पुजारी असतात. त्यांच्या सात पिढ्या विष्णू देवासाठी नैवेद्य बनवत असतात. मात्र त्यांची मुलगी मांसाहार बनवताना आणि खाताना दाखवलंय. चित्रपटात फरहान नावाच्या एका कलाकाराने म्हटलंय की प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, शिव आणि मुरूगन यांनीसुद्धा मांसाहार केला आहे. या सर्व वादग्रस्त विधानांमुळे अन्नपूर्णी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी देखील या विधानाचा संदर्भ दिला होता.

  राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला संदर्भ

  राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर सभेमध्ये प्रभू राम हे 14 वर्षे वनवासामध्ये मासांहार करत होते. शिकार करुन खात होते असे वक्तव्य केले. यानंतर जोरदार राजकीय वार- पलटवार होताना दिसून आला. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या वक्तव्यांवर स्पष्टीकरण देत अन्नपूर्णा चित्रपटाचा दाखल दिला. “खरं तर मला त्या सिनेमाबद्दल बोलायचे नाही आहे. पण एक उदाहरण म्हणुन सांगतो. अन्नपूर्णानी नावाचा चित्रपट आलाय दक्षिणेतील सुपरस्टार त्या चित्रपटात आहेत. ज्यात त्यांनी वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक सांगितला आहे आणि त्याचा अर्थही सांगितला आहे.” असा संदर्भ जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता.