संगीत क्षेत्रातील नवे तारे…

गायनाचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील स्पर्धकांना त्यांचं टॅलेण्ट सिद्ध करता यावं यासाठी हक्काचा मंच उभारला तो स्टार प्रवाह वाहिनीने. स्पर्धकांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सुरू झाला एक प्रवास तो म्हणजे मी होणार सुपरस्टार, आवाज कुणाचा महाराष्ट्राचा. वयाचं बंधन नसल्यामुळे अगदी ४ वर्षाच्या चिमुरड्यापासून ७० वर्षांच्या आजोबांपर्यंत प्रत्येकानेच या मंचावर आपली कला सादर केली.

  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या गायकांनी स्वतःला सिद्ध केलं आणि त्यातील २ सर्वोत्तम गायक आणि २ ग्रुप्सनी आता गाठली आहे महाअंतिम फेरी. अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या २१ ऑगस्टला पाहायला मिळणार आहे. मुंबईचा राम पंडित, संगमनेरची वर्षा एखंडे, सांगलीचा लोककलेचे शिलेदार ग्रुप आणि गोव्याच्या जिग्यासा ग्रुपमध्ये महाअंतिम लढत रंगणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा आवाज कोण ठरणार याची उत्सुकता वाढली आहे. त्यानिमित्ताने या शोमधील डाॅ. राम पंडित, सुनेहा ठाकूर, लॅरीसा अल्मेडा  यांनी नवराष्ट्र प्रतिनिधीसोबत संवाद साधला. त्या गप्पांचा हा सारांश.

  डाॅ. राम पंडित म्हणाला- खरंतर मी संगीत क्षेत्रात करिअर करायचं अस काही ठरवलं नव्हतंच. मी वैद्यकीय क्षेत्रात आलो पण तिव्रतेने मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे मलाच संगीताने सोडलं नाही कारण मध्ये मध्ये काही अशा घटना घडल्या तेव्हा मला वाटलं नव्हतं की, मी पुन्हा गाणार वगैरे आणि त्यात अभ्यासही असायचा. मी भरपूर संगीत ऐकायचो पण रियाज होत नव्हता आणि त्यात अनेक वर्षे गेली. पण सुदैवाने संगीत एका वेगळ्या इंटेंसिटीने माझ्याकडे परत आलं. आणि घरच्यांचा आणि मित्रपरिवाराचा मला तितकाच सपोर्ट मिळाला. त्यामुळे आज मी या शोमध्ये आहे.

  राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘फनरल’ मध्ये माझं पाहिलं ‘जगू आनंदे, निघू आनंदे…’ हे गाणं आलं आणि या गाण्याने मला एक वेगळी ओळख दिली.

  अजून एक किस्सा सांगताना डाॅ. राम पंडित म्हणाला- मी होणार सुपरस्टार च्या सेट वर जेव्हा मी बालगंधर्वच्या भूमिकेत होतो तेव्हा मी ‘मी’ नव्हतोच आणि त्या वेशभूषेत मी एक गाणं गाऊन बालगंधर्व यांना आदरांजली दिली आणि ती गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती. त्यावेळेस मला कळलं की एक स्त्री होणं किती कठीण असतं.

  सुनेहा ठाकूर संगीताबद्दल बोलताना म्हणाली संगीत माझ्यासाठी जीवन आहे. आपण नेहमी अस म्हणतो ना की, मला ह्याच्याशी लग्न करायचं आहे. मी माझं एक वेगळं अस्तित्व तयार करणार तस माझं लग्न संगीतासोबत झालंय. संगीत लहानपणापासून माझ्या रक्तात आहे. मी गेले तर माझं संगीत इथे राहील. मी आदर्श शिंदेंची खूप मोठी चाहती आहे. तसेच मी सुनिधी चौहानचीसुद्धा खूप मोठी चाहती आहे. त्यामुळे मी माझ्या नावाच्या पुढे सु ऍड करून ते सुनेहा अस केलं.

  लरीसा अल्मेडा म्हणाली- संगीत माझ्यासाठी माझा श्वास आहे. मी जिथे कुठे जाते तिथे माझ्या सोबत फक्त संगीतच असतं. मला सगळीकडे संगीत जाणवत. सेटवर बेलाताई, आदर्शदादा, सलीलदादा आणि इतर सगळ्यांनी खूप छान सहकार्य केलं आणि आम्ही सगळ्यांनी या शोमध्ये खूप धमाल केली. मला या शोमध्ये खूप काही शिकायला मिळालं. तिथे सगळेच माझ्या गुरुप्रमाणे होते.