सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी नवी अपडेट, दोन्ही शूटर्सची एनआयएनं केली चौकशी!

वांद्रे येथील बॉलीवूड अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांच्या पोलीस कोठडीत मुंबई न्यायालयाने गुरुवारी २९ एप्रिलपर्यंत वाढ केली. आता एनआयएने आरोपींची चौकशी केली आहे.

    १४ एप्रिल रोजी रविवारी पहाटे 5 वाजताअभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील  गॅलक्सी अपार्टमेंटबाहेर दोघांनी गोळीबार (Salman Khan House Firing Case) केला. या प्रकरणी दोन आरोपींना गुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी सूरतमधील तापी नदीतून दोन बंदूक आणि काही जिवंत काडतुसे जप्त केली. आता या प्रकरणी आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. या दोन्ही आरोपींची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून () चौकशी करण्यात आली आहे. गुरुवारीच न्यायालयाने अटक केलेल्या दोन्ही आरोपींच्या कोठडीत वाढ केली होती. आता एनआयएने दोन्ही आरोपींची चौकशी केली आहे.

    आरोपींच्या कोठडीत वाढ

    रविवारी , 14 एप्रिलला पहाटे पाच वाजता सलमान खानच्या घरावर दुचाकीवर आलेल्या आरोपींनी गोळीबार केला आणि तिथून पळ काढला. या घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दोन्ही आरोपी गोळीबार करून पळताना दिसले. दरम्यान पोलिसांनी तपासचक्रे फिरवत आरोपींचा मागोवा घेत त्यांना गुजरातच्य भुज येथून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केलं असता मुंबई गुन्हे शाखेने आरोपींच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 25 एप्रिलपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले आहे. काल दोघांनाही मुंबई न्यायलयात हजर केलं असत दोघांच्या पोलीस कोठडीत गुरुवारी २९ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

    एनआयएने आरोपींची चौकशी केली

    या प्रकरणी आता एनआयएची एन्ट्री झाली असून सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विक्की गुप्ता आणि सागर पाल या दोन आरोपींची राष्ट्रीय तपास यंत्रणेने चौकशी केली आहे. या चौकशीनंतर आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.