नोराचा जॅकलिनविरोधात मानहानीचा खटला, वाचा काय आहे नमकं प्रकरण ?

नोराने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले की, "जॅकलिन फर्नांडिसने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माझे करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तिने माझ्याबद्दल खोटे विधान केले जे अनावश्यक आणि अनुचित होते."

    नवी दिल्ली – नोरा फतेहीने सोमवारी जॅकलिनविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यानंतर सुकेश चंद्रशेखर फसवणूक प्रकरणात नोरा आणि जॅकलिन फर्नांडिस समोरासमोर आल्या आहेत. जॅकलिनशिवाय नोराने 15 मीडिया हाऊसविरुद्धही मानहानीचा खटला दाखल केला आहे. याचिकेत नोराने तिच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आणि तिने सुकेशकडून कोणतीही भेटवस्तू घेतली नसल्याचा दावा केला आहे. नोराने याचिकेत म्हटले की, प्रतिस्पर्ध्यांना तिच्या यशाचा हेवा वाटतो, त्यामुळेच त्यांना तिची कारकीर्द खराब करायची आहे.

    नोराने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले की, “जॅकलिन फर्नांडिसने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माझे करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तिने माझ्याबद्दल खोटे विधान केले जे अनावश्यक आणि अनुचित होते.”

    जॅकलिनने काही दिवसांपूर्वी पीएमएलए कोर्टात लिखित स्वरूपात दिले होते की, ईडीने याप्रकरणात तिला गोवले आहे, नोरा फतेही सारख्या सेलिब्रिटींनीही सुकेश चंद्रशेखरकडून भेटवस्तू घेतल्या होत्या. पण ईडीने त्यांना साक्षीदार बनवले.

    नोराने आपल्या याचिकेत दावा केला आहे की, ती सुकेशशी थेट संपर्क कधीच नव्हती. ती त्याला फक्त त्याची पत्नी लीना मारिया पॉलच्या माध्यमातून ओळखत होती. नोरा म्हणते की, मीडिया ट्रायलमुळे तिची प्रतिष्ठा खराब झाली आहे, ज्यासाठी जॅकलिन जबाबदार आहे. कोर्टात अपील करताना नोराने लिहिले- ‘माझ्यावर असे बेताल आरोप केल्याबद्दल, आरोपींवर कायद्यानुसार तत्काळ कारवाई करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे.’
    नोराने याचिकेत म्हटले, या प्रकरणात नाव ओढल्यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागला आहे. या प्रकरणात नाव आल्याने दुबईतील कॉन्सर्ट तिच्या हातून निसटल्याचा दावा नोराने केला आहे. यासोबतच अमेरिका, कॅनडासारख्या शहरांचे दौरेही तिच्या हातून गेले. अनेक कमर्शिअल डिल्समध्ये तिला रिप्लेस करण्यात आले. या प्रकरणात नाव आल्याने तिला तिची फी 50 टक्क्यांनी कमी करावी लागली, त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे नोराने म्हटले आहे.