bolibhasha ekankika spardha

सुप्रिया प्रॉडक्शन्स आयोजित ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धे’च्या (One Act Play) प्राथमिक फेरीच्या तारखा जाहीर झाल्या असून ९ ते ११ जानेवारी २०२३ रोजी या स्पर्धेची प्राथमिक फेरी तर जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात अंतिम फेरी होणार आहे.

    मुंबई: मराठी नाट्यवर्तुळातल्या महत्वाच्या आणि विशेष एकांकिका स्पर्धांपैकी (One Act Play Competition) एक असलेल्या सुप्रिया प्रॉडक्शन्स आयोजित ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धे’च्या प्राथमिक फेरीच्या तारखा जाहीर झाल्या असून ९ ते ११ जानेवारी २०२३ रोजी या स्पर्धेची प्राथमिक फेरी तर जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात अंतिम फेरी होणार आहे. (Drama Competition)

    प्रसिद्ध नाटककार गंगाराम गवाणकर (Gangaram Gawankar) यांच्या संकल्पनेला प्रसिध्द नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण (Govind Chavhan) यांनी मूर्त रुप दिले आणि २०१६ पासून ही स्पर्धा सुरु झाली. दोन वर्षांच्या कोविड काळानंतर या स्पर्धेचे पाचवे वर्ष जानेवारी २०२२ मध्ये उत्फुल्ल वातावरणात बहरले आणि कोविड काळानंतर हाऊसफुल्ल झालेली ही पहिली एकांकिका स्पर्धा ठरली. पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रभरातून अनेक बोलींमधून २१३ संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. या वर्षीदेखील ही स्पर्धा व्हिजन व्हॉईस एन अ‍ॅक्ट या संस्थेच्या सहकार्याने होत आहे.

    रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकांचे स्वरुप असून प्रथम चारसांघिक विजेत्यांसाठी अनुक्रमे २५०००, २००००, १५००० व ५००० अशी पारितोषिके आहेत. प्रथम पारितोषिक विजेत्या संघाला नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्काराने गौरवण्यात येणार असून हे पारितोषिक प्रख्यात अभिनेते अशोक सराफ व त्यांचे बंधू सुभाष सराफ यांनी पुरस्कृत केले आहे. अन्य पारितोषिकांमध्ये लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश, पार्श्‍वसंगीत, रंगभूषा, वेशभूषा, विनोदी लेखन, विनोदी अभिनय, वाचिक अभिनय, व्यवस्थापन या सर्वच घटकांसाठी पारितोषिके आहेत.

    कुर्ला-नेहरुनगर येथील प्रबोधन प्रयोग घरामध्ये ९ ते ११ जानेवारी रोजी या स्पर्धेची प्राथमिक फेरी होईल. स्पर्धेचे नियम व प्रवेश अर्ज www.supriyaproduction.com या वेबसाईटवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ९९३०४६६९२४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संघांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.