योगेशच्या मनात Aamir Khan आणि खांद्यावर सलमानचा हात!; हे शक्य झालंय… वाचा सविस्तर

'गणपती अंगणात नाचतो' या गाण्याचं दिग्दर्शनही मीच केलं, पण श्रेय घेतलं नाही. ही दोन्ही गाणी बनवताना एकच विचार मनात होता की, आतापर्यंत आपण गणपती आणि देवीवरची गाणी ऐकत आलो त्यात तोचतोचपणा आलाय. लोकांना यापेक्षा काहीतरी वेगळं अपेक्षित आहे.

    नवरात्रोत्सवाच्या वातावरणात काही गाणी रसिकांचं लक्ष वेधून घेत आहेत. नवरात्रीच्या या हंगामात ‘जय अंबे मां’ (Jay Ambe Maa) हे अंकिता राऊत आणि वृषभ शाह (Ankita Raut and Vrushabh Shah) यांच्यावर चित्रीत झालेलं गाणं (song) तळागाळातील रसिकांपर्यंत पोहोचलं आहे. या गाण्याचं दिग्दर्शन योगेश भोसले (Directed by Yogesh Bhosale) या नव्या दमाच्या दिग्दर्शकानं केलं आहे. योगेशचे दोन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, त्यानं आणखी चार चित्रपटांचं प्लॅनिंग केलं आहे. याबाबत त्यानं ‘नवराष्ट्र’शी केलेली खास बातचित…

    नवरात्रीमध्ये रिलीज झालेल्या ‘जय अंबे मां’ या गाण्याखेरीज योगेशनं ‘गणपती अंगणात नाचतो’ या गाण्यासह ‘बाजार’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याबाबत योगेश म्हणाला की, ‘बाजार’ या चित्रपटासाठी १६ पुरस्कार आहेत. २०१८ पासून फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटानं दिग्गजांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे. यात आदिती सारंगधर, कमलेश सावंत, गणेश यादव, सुरेखा कुडची, मिलिंद शिंदे आदी कलाकार आहेत. निर्मितीसोबत यात मी मुख्य भूमिकाही साकारली आहे.

    ‘गणपती अंगणात नाचतो’ या गाण्याचं दिग्दर्शनही मीच केलं, पण श्रेय घेतलं नाही. ही दोन्ही गाणी बनवताना एकच विचार मनात होता की, आतापर्यंत आपण गणपती आणि देवीवरची गाणी ऐकत आलो त्यात तोचतोचपणा आलाय. लोकांना यापेक्षा काहीतरी वेगळं अपेक्षित आहे.

    चित्रपटांइतकंच गाण्यांमध्येही वेगळेपण देऊ शकतो असं वाटल्यानं ‘गणपती अंगणात नाचतो’ आणि ‘जय अंबे मां’ ही दोन गाणी बनवली. शब्दरचना, संगीत आणि ॲरेंजिंग खूप वेगळं आहे. कलाकारांसोबतच गीत-संगीतकारांनी ज्या एनर्जीनं हे गाणं बनवलं आहे, त्याच एनर्जीनं ते रसिकांपर्यंत पोहोचलं आहे. रसिकही हे गाणं एन्जॅाय करत आहेत. देवीमातेवर असलेलं हे गाणं एन्जॅाय करण्याची संधीही देतं. देवी माता सांगतेय की, जगत रहा शिकत रहा, स्वत:मध्ये रमत रहा आणि स्वत:वर प्रेमही करत रहा असा उल्लेख या गाण्यात आहे. त्यामुळं हे गाणं आजच्या वातावरणात एक प्रकारे जगण्याची नवी उर्मी देणारं वाटलं.

    वृषभ-अंकीता या जोडीचा अभिनय

    शारदा फिल्म्स प्रोडक्शनच्या बॅनरखाली हे गाणं पुण्यात शूट करण्यात आलं आहे. अंकिता राऊत आणि वृषभ शाह यांच्यावर हे गाणं शूट करण्यात आलं आहे. गाण्याच्या दिग्दर्शनासोबत संकल्पनाही माझीच आहे. रसिकांचा रिस्पाँस खूप चांगला मिळत आहे. या नवरात्रोत्सवात देवी मातेवर जी गाणी आली आहेत, त्यात ‘जय अंबे मां’ला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी हे गाणं वाजताना दिसत आहे. पिकल म्युझिकच्या समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांनी हे गाणं तळागळातील रसिकांपर्यंत पोहाचवलं असल्यानं केलेली मेहतन फळाला आल्याचं चित्र पहायला मिळत आहे. आतापर्यंत या गाण्याला जवळपास ४० हजार व्ह्यूज मिळाले आहेत.

    ‘वनफोरथ्री’ आणि ‘मंगलाष्टक रिटर्न्स’

    रक्षाबंधनच्या दिवशी मी दिग्दर्शित केलेल्या ‘वनफोरथ्री’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. मध्यंतरी पुण्यामध्ये एक घटस्फोट सोहळा खूप गाजला. तो ज्या चित्रपटातील आहे त्या ‘मंगलाष्टक रिटर्न्स’ हा चित्रपटही मीच दिग्दर्शित केला आहे. ‘वनफोरथ्री’ आणि ‘मंगलाष्टक रिटर्न्स’ हे दोन्ही चित्रपट रिलीजसाठी रेडी आहेत. ‘वनफोरथ्री’ फेब्रुवारीमध्ये ‘मंगलाष्टक रिटर्न्स’ आणि मे महिन्यात रिलीज करण्याचं प्लॅनिंग आहे. त्यानंतर ‘झाशीची राणी लक्ष्मी’ या चित्रपटाची घोषणा करणार आहे. ‘मंगलाष्टक रिटर्न्स’मध्ये प्रसाद ओक, कमलेश सावंत, नीता चव्हाण, आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, वृषभ शाह, प्रसन्न केतकर आणि श्वेता हे कलाकार आहेत.

    आणखी चार चित्रपटांचं प्लॅनिंग

    माझ्या करियरची सुरुवात प्रोडक्शन मॅनेजमेंट आणि कास्टिंगपासून झाली आहे. सलमान खानचा ‘बॅाडीगार्ड’ आणि राणी मुखर्जीचा ‘अय्या’ यांसारख्या काही चित्रपटांसाठी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम पाहिलं. आता अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत काम करतोय. २००७ मध्ये मी परभणीहून पुण्यात आलो. घरी कोणीही क्षेत्रात नाही. बाबा सरकारी नोकरी करतात. घरची शेती आहे. लहानपणापासून कलेक्टर किंवा ॲक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण अभिनयात दाखल होणं हे स्वप्न पाहण्याइतकं सोपं नाही. खूप स्ट्रगल केला. पुण्यात आल्यावर ‘अमरप्रेम’ ही श्रीरंग गोडबोलेंची मालिका पाहिली, तेव्हा आपणही या क्षेत्रात काम करू शकतो असं जाणवलं. कास्टिंग करू लागलो आणि पुण्यात नाव झालं. त्यानंतर अभिनयापेक्षा दिग्दर्शनाच्या माध्यमातून आपण आपले विचार अधिक चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवू शकतो याची जाणीव झाली. सेटवर जायचो तेव्हा दिग्दर्शकाकडं जास्त कल असायचं. त्यानंतर  ‘वनफोरथ्री’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाकडे वळलो. कोणालाही असिस्ट केलं नाही. ‘बाजार’ चित्रपटावेळी लेखक डॅा. भालचंद्र गायकवाड यांच्याकडून काही गोष्टी शिकलो. माझे चार प्रोजेक्ट लाईनमध्ये आहेत. ‘आंबेडकर नगर’, ‘झाशीची राणी लक्ष्मी’, ‘अलिबाबा चाळीच पोरं’ आणि ‘श्रावणबाळ’ या चार चित्रपटांचं प्लॅनिंग आहे.

    आमिरचा फॅन

    मी आमिर खानला कंटेंट, अभिनय आणि कमर्शिअल इन्टेन्शनसाठी फॅालो करतो. अभिनेता आणि थॅाटवाईज चित्रपटाचा विचार करणारा कलाकार म्हणून आमिर मला आवडतो. अभिनय आणि डेडीकेशन काय असतं हे त्याच्याकडून शिकायला हवं असं वाटतं. दिग्दर्शनातील बारीकसारीक गोष्टी शिकण्यासाठी दिवसातून दोन चित्रपट पहातो. जास्त करून दक्षिणात्य चित्रपटांना फॅालो करतो. ‘वनफोरथ्री’ची भाषा जरी मराठी असली तरी हा चित्रपट टेक्निकल आणि ट्रीटमेंटवाईज पूर्णपणे दक्षिणात्य चित्रपटांसारखा आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लुकचं कौतुक झालं आहे. फिल्म्स पाहून, शॅार्ट डिव्हिजन काय असतं, स्टोरी बोर्ड काय असतं हे जाणून मी दिग्दर्शन शिकलो आहे. काही जवळच्या मित्रांनी नकळत दिग्दर्शनाबद्दल केलेलं मार्गदर्शन कामी आलं.

    खांद्यावर हात ठेवणारा सलमान होता

    हिंदीत बरंच काम केलं असल्यानं दोन्ही इंडस्ट्रीचा अनुभव आहे. दोन्हीकडे थोडाफार फरक आहे. हिंदीत सर्व काही ठरलेल्या वेळेवर सुरू होतं. आघाडीच्या कलाकारांमध्ये काम करण्याचं एक वेगळंच डेडीकेशन असल्याचं मला त्यांच्यासोबत राहिल्यावर जाणवलं. सलमानसोबतचा अनुभव सांगायचा तर ‘बॅाडीगार्ड’मधील ‘आय लव्ह यू…’ गाण्यातील सायकल वारंवार पंचर व्हायची. त्यावेळी मी प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये असल्यानं सायकलचं पंचर काढायला घेतलं असताना पाठीमागून एक आवाज आला की, ‘अरे चल रुक, मैं देखता हूं’. तेव्हा पाठीमागं न वळता मी म्हणालो, ‘मै देख रहा हूं ना, रुक जा एक मिनिट’ असं म्हटलं आणि मागं वळून पाहिलं तर खांद्यावर हात ठेवणारा सलमान होता. पडद्यावर दिसणारा आणि खराखुरा सलमान खूप वेगळा असल्याचा अनुभव त्या दरम्यान आला.

    हा दिग्दर्शकासाठी मोठा टास्क

    जिथं आपण अभिनय करू शकतो असं वाटतं तिथंच मी स्वत:ला अभिनेता म्हणून सादर करतो. ‘वनफोरथ्री’मधलं कॅरेक्टर माझ्याकडून होण्यासारखं होतं म्हणून मी ते केलं. टेक्निकल स्क्रिनिंगमध्ये माझा अभिनय सर्वांना आवडतोय याचं समाधान आहे. माझ्या जागी दुसरा कोणी अभिनेता असता तर दिग्दर्शनासोबत हा चित्रपट ठरलेल्या वेळेत पूर्ण करू शकला नसता. हा चित्रपट लॅाकडाऊनमध्ये ठरलेल्या वेळेत पूर्ण करायचा होता. कमी वेळेत कलाकारांकडून चांगला अभिनय करून घेणं हा दिग्दर्शकासाठी मोठा टास्क असतो. हा टास्क ‘वनफोरथ्री’मध्ये पूर्ण केला आहे. यानंतरच्या चार चित्रपटांपैकी दोन मध्येच मी अभिनय करणार आहे. यापैकी ‘आंबेडकर नगर’मध्ये दिसेन. ज्या कॅान्सेप्टसाठी मी योग्य वाटतो तिथेच मी अभिनय करतो.