महिलांच्या वाहन चालविण्याच्या अधिकारासाठी संघर्ष करणाऱ्या,मानवाधिकार कार्यकर्तीला ६ वर्षांची शिक्षा

सौदी सरकारकडून लॉजेनला तीन वर्षांपूर्वी ताब्यात घेण्यात आले होते. विदेशी दलालांसोबत हेरगिरीचे काम करून देशाविरोधात कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या आरोपाप्रकरणी ती दोषी आढळली आहे. या प्रकरणात अनेक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांकडून लॉजेनची मुक्तता करण्याची मागणी जोर धरू लागली होती

दुबई: सौदी अरेबियात महिलांना वाहन चालविण्याचा अधिकार मिळावा यासाठी संघर्ष करणाऱ्या आणि सौदी अरेबियातील मानवाधिकार कार्यकर्ती लॉजेन-अल-हथलौलला सहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हथलौलला दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत ही सहा वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. सौदी सरकारकडून लॉजेनला तीन वर्षांपूर्वी ताब्यात घेण्यात आले होते. विदेशी दलालांसोबत हेरगिरीचे काम करून देशाविरोधात कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या आरोपाप्रकरणी ती दोषी आढळली आहे. या प्रकरणात अनेक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांकडून लॉजेनची मुक्तता करण्याची मागणी जोर धरू लागली होती. जुलै २०१८ पासून लॉजेन सौदी अरेबियाच्या ताब्यात आहेत. न्यायालयाने त्यांची शिक्षा दोन वर्षे दहा महिने कमी केली असून, वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी त्यांना ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांसह युरोपीय महासंघाच्या सदस्यांनी या निर्णयानंतर सौदी अरेबिया सरकारवर टीका केली आहे. मानवी हक्कांबाबत काम करणाऱ्या एका संघटनेने लॉजेन-अल-हथलौलला यांची मार्च २०२१ पर्यंत मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.