रवींद्र नाट्यमंदिरात पुन्हा रंगणार ‘पु. ल. कट्टा’, ‘पुरुषोत्तम’ मधून उलगडणार पुलंच्या व्यक्तिरेखेतील अपरिचित रंग

राज्यभरातील उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन मिळावे, तसेच सादरीकरणासाठी हक्काची जागा मिळावी या उद्देशाने ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २०१८ मध्ये ‘पु. ल. कट्टा’ या विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. परंतु करोनाकाळात हा उपक्रम होऊ शकला नाही.

    मुंबई – महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांना मुंबईत हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने सुरू करण्यात आलेला “पु. ल. कट्टा ” हा उपक्रम पुन्हा एकदा सुरू होत आहे. पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून रविवारी १२ जून, सायंकाळी ४.३० वाजता रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणात “प्रयोगशाळा” प्रस्तुत “पुरुषोत्तम” या कार्यक्रमाने या उपक्रमाची सुरुवात होईल त्यानंतर कल्पांगण सांस्कृतिक केंद्र प्रस्तुत “जावे पु. लं च्या गावा ” हा कार्यक्रम सादर होईल

    राज्यभरातील उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन मिळावे, तसेच सादरीकरणासाठी हक्काची जागा मिळावी या उद्देशाने ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २०१८ मध्ये ‘पु. ल. कट्टा’ या विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. परंतु करोनाकाळात हा उपक्रम होऊ शकला नाही.

    सध्या रंगभूमीला चालना मिळत असतानाच नवोदित कलाकारही व्यासपीठापासून फार काळ वंचित राहू नये म्हणून पुन्हा एकदा “पु. ल. कट्टा” सुरू करण्याचा निर्णय अकादमीने घेतला आहे. पु. ल. देशपांडे यांच्या २२ व्या स्मृतिदिनी म्हणजेच रविवारी १२ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता पु. ल. कट्ट्यावर ‘प्रयोगशाळा’ प्रस्तुत ‘पुरुषोत्तम’ या प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. पुलंच्या अपरिचित साहित्याला आणि त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील अपरिचित छटांना रसिकांसमोर आणणारा हा प्रयोग आहे. यामध्ये केवळ पुलंचे अपरिचित साहित्यच नव्हे तर पुलंनी लिहिलेली पत्रे, पुलंना काही दिग्गजांनी लिहिलेली पत्रे, लेख, उतारे यांचे भावस्पर्शी अभिवाचन तक्षिल खानविलकर, मल्हार शितोळे आणि सुमेध समर्थ हे तीन कलाकार करणार आहेत.

    तसेच कल्पांगण सांस्कृतिक केंद्र प्रस्तुत “जावे पु. लं च्या गावा ” हा पु. लं च्या साहित्यावर आधारित नृत्यनाट्य रंगाविष्कार सादर होणार आहे.

    “पु. ल. कट्टा” या उपक्रमामध्ये कलाकारांना काव्यवाचन, पथनाट्य, एकपात्री, लोककला, एकांकिका, संगीत वादन-गायन तसेच साहित्यविषयक कलाकृतींचा समावेश करता येईल. कलाकारांना याकरिता कोणतेही मानधन मिळणार नाही परंतु आवश्यक त्या तांत्रिक बाबींची (ध्वनी, प्रकाश) पूर्तता शासनाकडून केली जाईल. त्यासाठी कलाकारांनी आपले अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडे पाठवणे गरजेचे आहे. यासाठी समन्वयक राकेश तळगावकर यांच्याशी संपर्क करावा. कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी “पु.ल. कट्टा” हे हक्काचे व्यासपीठ खुले झाल्याने नवोदित कलाकारांसाठी हा उपक्रम पर्वणी ठरणार आहे.