राजश्रीच्या आगामी चित्रपटातून पलोमा करणार पदार्पण

राजश्री प्रॉडक्शन राजवीर देओलला घेऊन नवा चित्रपट सुरु करीत आहे. याच चित्रपटातून पलोमा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

    मुंबई : राजश्री प्रॉडक्शन राजवीर देओलला घेऊन नवा चित्रपट सुरु करीत आहे. याच चित्रपटातून पलोमा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटातील राजवीरच्या नायिकेच्या भूमिकेसाठी पलोमाची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रतिष्ठित चित्रपट निर्माते सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीश एस. बडजात्या करणार आहे. अवनीशही या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून प्रथमच प्रेक्षकांसमोर येणार आहे. राजश्रीचा हा ५९ वा चित्रपट असून जुलै २०२२ मध्ये मुंबईत चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. चित्रपटाचे शीर्षक अजून ठरवण्यात आलेले नाही.

    पलोमा ही प्रख्यात अभिनेत्री पूनम ढिल्लन आणि प्रख्यात निर्माते अशोक ठाकरिया यांची मुलगी आहे. राजवीर-पलोमा अभिनीत अवनीश दिग्दर्शित या चित्रपटात आधुनिक युगातील प्रेमकथा मांडण्यात येणार असून ही कथा एका भव्य डेस्टिनेशन वेडिंगच्या पार्श्वभूमीवर असणार आहे.

    “पलोमा ही एक अत्यंत सशक्त कलाकार आहे आणि तिचा स्क्रीनवरचा वावरही जबरदस्त आहे,” असे पलोमाबाबत बोलताना अवनीशने सांगितले. अवनीश पुढे म्हणाला, “माझ्या मनात नायिकेची जी प्रतिमा होती त्यात पलोमा अगदी फिट बसली आहे. ती अत्यंत उत्साही आणि कामाप्रती निष्ठावान असल्याने तिच्यासोबत रोज काम करणे खूप आनंददायी होते. पलोमा आणि राजवीर यांची पडद्यावर केमिस्ट्री छान जुळलेली असून प्रेक्षकांना ही जोडी नक्कीच आवडेल यात शंका नाही. हे दोघेही त्यांच्या भूमिकांमध्ये अत्यंत मिसळून गेलेले आहेत. राजवीर आणि पलोमा यांची जोडी प्रेक्षकांना सनी देओल आणि पूनम ढिल्लन यांच्या जोडीची आठवण करून देणारी ठरेल.

    अवनीशचा हा चित्रपट आधुनिक युगातील नातेसंबंध आणि त्यातील गुंतागुंत आणि साधेपणा यावर आधारित आहे. राजश्री प्रॉडक्शन नवोदितांना लॉन्च करण्यासाठी ओळखली जाते. राजश्रीने आपल्या ७५ वर्षांच्या कालावधीत अनेक कलाकारांना यशस्वी ब्रेक दिला आहे. अवनीशच्या चित्रपटातूनही राजवीर आणि पलोमा यांची जोडी सादर करून राजश्रीचा वारसा पुढे नेला जात आहे.