ख्यातनाम  गझल गायक पंकज उधास यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’तर्फे गौरव, सामाजिक कार्यासाठी केला सन्मान

या पुरस्काराबद्दल बोलताना श्री उधास यांनी ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने दिलेल्या ‘सर्टीफिकेट ऑफ कमीटमेंट’साठी कृतज्ञता व्यक्त केली आहे

    लंडन येथील ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने हा सन्मान नुकताच केला आहे. या प्रमाणपत्राच्या गोषवाऱ्यामध्ये या संस्थेने म्हटले आहे की, “कोविड-१९साथरोगाच्या काळात लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही जे अथक आणि समर्पित प्रयत्न केलेत त्यासाठी तसेच लोकांच्या वेदना कमी व्हाव्यात म्हणून तुम्ही जे प्रामाणिक योगदान दिलेत त्यासाठी हा सत्कार करण्यात येत आहे. त्याशिवाय हा गौरव जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोनाचा प्रतिबंध व्हावा म्हणून आपण दिलेल्या मार्गदर्शनासाठीही केला जात आहे.” या प्रमाणपत्रावर संस्थेचे युरोप प्रांताचे स्वित्झर्लंडस्थित प्रमुख विल्हेम जेझलरयांची सही आहे.

    या पुरस्काराबद्दल बोलताना श्री उधास यांनी ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने दिलेल्या ‘सर्टीफिकेट ऑफ कमीटमेंट’साठी कृतज्ञता व्यक्त केली आहे. “हा सन्मान उत्साह वाढवणारा असून मानवतेप्रती अधिक चांगले काम करण्यासाठी बळ देणारा ठरेल. मी या गौरवासाठी ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’चे संचालक विल्हेम जेझलर यांचे मनापासून आभार मानतो,” असेही श्री उधास यांनी पुढे म्हटले आहे.

    पंकज उधास हे भारतीय संगीत क्षेत्रातील एक श्रेष्ठ असे गायक असून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांत जीवनगौरव पुरस्कारांचाही समावेश आहे. भारतातील गझलगायन क्षेत्रातील ते महत्वाचे आधारस्तंभ मानले जातात. त्यांनी या संगीतप्रकाराला एक वेगळी शैली मिळवून दिली. त्यांनी आणि त्यांच्याबरोबरच्या कलाकारांनी भारतात गझलगायनाला एक नवसंजीवनी मिळवून दिली. त्यांनी कित्येक अल्बम आणि गाणी ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या आहेत आणि आज त्यांना भारतातील एक महान गझलगायक मानले जाते. त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. त्याद्वारे त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाचा आणि त्यांच्या प्रतिभेचा सन्मान करण्यात आला आहे.

    ‘चिट्ठी आई है’ या ‘नाम’ चित्रपटातील गाण्याने १९८६ साली त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. एका रात्रीत त्यांना राष्ट्रीय स्तरावरील लोकप्रियता मिळाली. या हिट गाण्यानंतर त्यांनी बॉलीवूडमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गायली आणि ती अनंत काळापर्यंत रसिकांच्या मनावर गारुड करून आहेत.

    पंकज उधास यांच्याकडे गझल लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते. हा प्रकार लुप्त होत असताना त्यांनी हे कार्य यशस्वीपणे पार पाडले आहे. आज उच्चरवातील संगीताचा जमाना असतानाही संगीत रसिकांमध्ये गझलची जादू जगभरात कायम ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे. शिवाय संगीत कोणत्याही वाद्यातून येणारे नसून ते कलाकाराच्या आत्म्यातून बाहेर पडते, हे त्यांनी सिद्ध केले.