parikshit sahni strange encounters book

‘स्ट्रेंज एन्काउंटर्स’ (Strange Encounters) या अभिनेते परिक्षित साहनी (Parikshit Sahni) यांच्या पुस्तकाचं प्रकाशन २८ ऑगस्ट रोजी मुंबईत अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) व दीप्ती नवल (Deepti Naval) यांच्या हस्ते होणार आहे.

  ज्येष्ठ अभिनेते परिक्षित साहनी (Parikshit Sahni) यांच्या ‘स्ट्रेंज एन्काउंटर्स’ (Strange Encounters) या पुस्तकाचं प्रकाशन २८ ऑगस्ट रोजी मुंबईत अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) व दीप्ती नवल (Deepti Naval) यांच्या हस्ते होणार आहे.

  या पुस्तकाविषयी परिक्षित साहनी सांगतात की,“हे पुस्तक म्हणजे लेख, आठवणी आणि वृत्तांतांचे मिश्रण आहे. मी आयुष्यभर केलेल्या प्रवासांदरम्यान माझ्या मनावर ठसा उमटवणाऱ्या वेगवेगळ्या घटनांचा यात समावेश आहे. आठवणींना उजाळा देत असताना प्रकर्षाने आठवेले प्रसंग मी लिहून काढले आहेत. रशियात घेतलेले चित्रपटाचे प्रशिक्षण, बॉलिवूडमधील दिवस व सेलिब्रिटी म्हणून आलेले अनुभव यांच्या आठवणी या पुस्तकात उलगडण्यात आल्या आहेत.”

  परिक्षित साहनी हे  गुल गुलशन गुलफाम (दूरदर्शन), गाथा (स्टारप्लस) आणि बॅरिस्टर विनोद या मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांनी राजकुमार हिरानी यांच्या लगे रहो मुन्नाभाई, थ्री इडियट्स व पीके आदी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत. ते प्रख्यात अभिनेते बलराज साहनी यांचे पुत्र आहेत, तसेच प्रसिद्ध लेखक भीष्म साहनी यांचे पुतणे आहेत.

  “हा संग्रह म्हणजे प्रख्यात अभिनेते परिक्षित साहनी यांच्या थेट हृदयातून आलेल्या आठवणी आहेत.यातील प्रत्येक प्रकरण हे एका विशिष्ट घटनेबद्दल सांगणारे असले, तरी त्यांच्या आयुष्याचा प्रवासयात परिपूर्णतेने सामावला आहे. हे पुस्तक खूपच प्रामाणिकपणे तरीही सध्या दुर्मीळ होत चाललेल्या हृदयस्पर्शी अशा हलक्याफुलक्या पद्धतीने लिहिलेले आहे. परिपूर्णतेने जगलेल्या एका आयुष्याची ही कथा आहे. हे आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीला वाचक विविध काल्पनिक व्यक्तिरेखांच्या स्वरूपात पडद्यावर अनेकदा भेटलेले आहेत, आता या व्यक्तिरेखांमागील खऱ्या व्यक्तीला भेटण्याची संधी त्यांना मिळणार आहे,” असे सायमन अँड शूस्टर इंडियाचे वरिष्ठ कमिशनिंग संपादक संयतन घोष म्हणाले.

  परिक्षित साहनी यांनी आपल्या आयुष्यात जमवलेली प्रवासवर्णने, आठवणी व आयुष्यात मिळालेल्या शिकवणींचा हा संग्रह आहे. मॉस्कोतील सोन्यासारख्या शरद ऋतूत चायकोवस्कीच्या तालावर थिरकवलेल्या पावलांच्या, मुंबईला परत येण्याच्या व आपल्या मुळांच्या,बॉलिवूडमधील प्रवेशाच्या व प्रसिद्धी प्राप्त केल्याच्या अनेक स्मृती यात आहेत. साहनी यांनी कालानुरूप या कथांची मांडणी केली आहे. त्यांचा लोलक मात्र विनोदी ते अत्यंत भीतीदायक अनुभवांमध्ये मुक्त फिरला आहे. चित्रपटांच्या सेट्सवर त्यांनी स्वत:ला मृत्यूविषयी वाटणाऱ्या भयाचा (थँटोफोबिया) सामना कसा केला, त्यांचे नास्तिक असणे, अजिबात तयारी न करता केलेला अमरनाथचा ट्रेक यांच्या आठवणी त्यांनी जागवल्या आहेत.  सध्याच्या काश्मीरमधील सांस्कृतिक संघर्षांची सखोल माहितीही देतात. रशियातील कोवळ्या प्रेमाचा थरार आणि विश्वासघाताच्या धक्क्यांच्या स्मृतीही साहनी यांनी उलगडल्या आहेत तसेच पाकिस्तानचा अभ्यास, विविध संस्कृती नांदणाऱ्या भारताच्या इतिहासाचा धांडोळा, एका निर्वासिताच्या दृष्टिकोनातून वर्तमान राजकीय परिस्थितीचा आढावा हे सगळे या पुस्तकात आहे.

  विद्वत्तापूर्ण कथनशैलीत स्ट्रेंज एन्काउंटर्स हे पुस्तक लिहिले गेले आहे आणि वाचकाला आपलेसे करून घेणारी शैलीही अवलंबण्यात आली आहे. हिंदू, ख्रिश्चन व इस्लामी तत्त्वज्ञानांतील चांगुलपणा यात एकत्र करण्यात आला आहे; सोव्हिएत रशियात चित्रपटाची कला शिकण्यापासून ते भारतीय चित्रपटसृष्टीसाठी स्टॅनिस्लॅवस्कीचा त्याग करण्यापर्यंत, तसेच या संपूर्ण मार्गात शांतता व जागा शोधण्यापर्यंत, परिक्षित साहनी यांच्या संपूर्ण प्रवासाचे हे बहुसांस्कृतिक, बहुअंगीय कथन आहे.