strange encounters book launch

ज्येष्ठ अभिनेते परिक्षित साहनी (Parikshit Sahni) यांच्या ‘स्ट्रेंज एन्काउंटर्स’ (Strange Encounters) या पुस्तकाचे प्रकाशन अनुपम खेर (Anupam Kher) आणि दीप्ती नवल (Deepti Naval)  यांच्या हस्ते मुंबईत झाले.

  ज्येष्ठ अभिनेते परिक्षित साहनी (Parikshit Sahni) यांच्या ‘स्ट्रेंज एन्काउंटर्स’ (Strange Encounters) या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी मुंबईतील मॅरिएट हॉटेलमध्ये अनुपम खेर (Anupam Kher) आणि दीप्ती नवल (Deepti Naval)  यांच्या हस्ते झाले. यावेळी परिक्षित साहनी, अनुपम खेर आणि दीप्ती नवल यांनी प्रेक्षकांसोबत संवाद साधला.

  परिक्षित साहनी म्हणाले की, हे पुस्तक म्हणजे मी आयुष्यभर केलेल्या प्रवासादरम्यान माझ्या मनावर ठसा उमटवणाऱ्या वेगवेगळ्या घटनांची नोंद आहे. आयुष्यातील अनेक आठवणी, प्रसंग मी यात लिहून ठेवले आहेत. रशियात घेतलेले चित्रपटाचे प्रशिक्षण, बॉलिवूडमधील दिवस व सेलेब्रिटी म्हणून आलेले अनुभव यांच्या आठवणी यात उलगडण्यात आल्या आहेत.

  परिक्षित साहनी हे भारतीय अभिनेते आहेत आणि ते गुल गुलशन गुलफाम (दूरदर्शन), गाथा (स्टारप्लस) आणि बॅरिस्टर विनोद या मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांनी राजकुमार हिरानी यांच्या लगे रहो मुन्नाभाई, थ्री इडियट्स व पीके आदी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत. ते प्रख्यात अभिनेते बलराज साहनी यांचे पुत्र आहेत, तसेच प्रसिद्ध लेखक भीष्म साहनी यांचे पुतणे आहेत.

  यावेळी अनुपम खेर म्हणाले की, या पुस्तकामुळे लोकांना त्यांच्या जीवनातील अनुभवलेले ‘स्ट्रेंजर काउंटर’ नक्कीच आठवतील.
  मला ‘स्ट्रेंज एन्काउंटर्स’ हे शीर्षक आवडलं, कारण प्रत्येकजण, त्यांच्या आयुष्यात कधीतरी, काहीतरी उल्लेखनीय अनुभव घेतो, एक गोष्ट सांगेन की तुमच्या अपयशाच्या घटना म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या सर्वोत्तम कथा बनतात. स्ट्रेंज एन्काऊंटर्स ह्या पुस्तकामुळे आज माझ्यासोबत बलराज सहानी यांच्या आठवणीसुद्धा डोळ्या समोर आल्या आहेत, असे अनुपम खेर म्हणाले.

  “हा संग्रह म्हणजे प्रख्यात अभिनेते परिक्षित साहनी यांच्या थेट हृदयातून आलेल्या आठवणी आहेत. यातील प्रत्येक प्रकरण हे एका विशिष्ट घटनेबद्दल सांगणारे असले, तरी त्यांच्या आयुष्याचा प्रवासयात परिपूर्णतेने सामावला आहे. हे पुस्तक हृदयस्पर्शी अशा हलक्याफुलक्या पद्धतीने लिहिलेले आहे. परिपूर्णतेने जगलेल्या एका आयुष्याची ही कथा आहे. हे आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीला वाचक विविध काल्पनिक व्यक्तिरेखांच्या स्वरूपात पडद्यावर अनेकदा भेटलेले आहेत, आता या व्यक्तिरेखांमागील खऱ्या व्यक्तीला भेटण्याची संधी त्यांना मिळणार आहे,” असे सायमन अँड शूस्टर इंडियाचे वरिष्ठ कमिशनिंग संपादक संयतन घोष म्हणाले.

  परिक्षित साहनी यांना रशिया, भारत व बॉलिवूडमध्ये आलेले अनुभव स्ट्रेंज एन्काउंटर्स या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. त्यांचे पहिले पुस्तक ‘द नॉनकन्फर्मिस्ट’ हे त्यांचे वडील बलराजसाहनी यांचे चरित्र होते, तर स्ट्रेंज एन्काउंटर्स या पुस्तकामध्ये स्वत:च्या आयुष्यातील प्रसंग त्यांनी मांडले आहेत.

  प्रवासवर्णने, आठवणी व आयुष्यात मिळालेल्या शिकवणींचा संग्रह परिक्षित साहनी यांनी या पुस्तकात केला आहे.