prarthana behre in glitter

झी मराठीवरील ‘तुझी माझी रेशीमगाठ’ या मालिकेद्वारे घराघरात पॅाप्युलर झालेली प्रार्थना बेहरे(Prarthana Behre) ‘ग्लिटर’(Glitter) या आगामी हिंदी वेब शोमध्ये एका वेगळ्या रूपात दिसणार आहे. २९ ऑक्टोबरला झी५ वर प्रदर्शित होणाऱ्या या वेब शोच्या निमित्तानं प्रार्थनानं(Prarthana Behre Interview) ‘नवराष्ट्र’शी साधलेला एक्सक्लुझीव्ह संवाद...

  ‘ग्लिटर’बाबत प्रार्थना म्हणाली की, एकीकडं ‘तुझी माझी रेशीमगाठ’ ही मालिका गाजत असताना ‘ग्लिटर’ ही वेब सीरिज रसिकांच्या भेटीला येत असल्यानं खूप एक्सायटेड आहे. याचं दुसरं कारण सांगायचं तर या वेब सीरिजचं दिग्दर्शन माझा नवरा अभिषेक जावकरनं केलं आहे. आमचं हे एकत्र फर्स्ट व्हेंचर असल्यानं वेगळीच उत्सुकता आहे. स्टोरी आणि स्क्रीनप्लेसुद्धा अभिनंच लिहीला आहे. आम्ही प्रोड्युसरही आहोत. माझं फर्स्ट व्हेंचर झीवरच आलं होतं आणि आताही मी झीवरच काम करतेय. अभिची पहिली वेब सीरिजही झीवरच येत असल्याचा वेगळाच आनंद आहे. झी आम्हा दोघांसाठी लकी असल्याचं मी म्हणेन. एक नवीन सुरूवात झाली आहे.

  खरं सांगायचं तर ‘ग्लिटर’साठी मला अभिनं अगोदर कास्टच केलेलं नव्हतं. आमचं लग्न ठरलं होतं, तेव्हाच त्यानं या स्टोरीबद्दल सांगितलं होतं. एक स्टोरी लिहिली असून, त्यावर सीरिज करायची इच्छा अभिनं व्यक्त केली होती. ही तीन मुलींची स्टोरी असून, मर्डर मिस्ट्री आहे. अभिनं वनलाईन नॅरेट केली होती आणि तेव्हापासून मलाही यात एक रोल करण्याची इच्छा होती, पण मी ती कधी बोलून दाखवली नाही. यातील तिनही कॅरेक्टर्स खूप इंटरेस्टींग आहेत. मला खूप वेळा वाटलं बोलावंसं, पण मीच माझ्या नवऱ्याकडं रोल मागितला तर व्हॅाट इज द बिग डील… त्याला कळूदे की मी चांगली अभिनेत्री आहे. त्याला समोरून विचारू दे की तू करतेस का… मी कधीही त्याला विचारलं नाही किंवा सांगितलंही नाही. माझी एंट्री होण्यापूर्वी अभिनं एका मुलीला कास्टही केलं होतं. तिच्यासोबत त्यांचे सेमिनार्सही झाले. शूटवर जाण्यापूर्वी डेट्सचा इश्यू झाला आणि शूट दोन महिने पोस्टपोन झालं. दोन महिन्यांनंतर अभिला वाटलं की तिच्यापेक्षा आपण दुसऱ्या कोणाला तरी विचारूया. मग तो माझ्याकडं आला आणि म्हणाला की, मी खूप मुलींची चाचपणी केली, पण मला असं वाटतं की तूच हा रोल चांगला करशील. कारण तू छान अभिनेत्री आहेस. अशा प्रकारे माझी एंट्री झाली.

  ग्लिटरी वर्ल्डबाबतची स्टोरी
  ‘ग्लिटर’बाबत जास्त काही रिव्हील करता येणार नाही, पण ग्लिटरी वर्ल्डबाबतचीही स्टोरी आहे. मुलींबाबत आपण नेहमी म्हणतो की, त्यांचं सर्व सुंदर-सुंदर, छान-छान असतं, पण मुलींच्या या ग्लिटरी वर्ल्डमध्ये अचानक काही घडल्यावर खरंच त्यांचं आयुष्य तितकं सुंदर राहतं का, त्यांचं आयुष्य ग्लिटरी आहे का, त्यांचं आयुष्य खरोखर सुंदर आहे की नाही. जे दिसतं ते ग्लिटर असतं का, जे चमकतं ते ग्लिटर असतं का, की सर्व फेक असतं हे दाखवणारी ही स्टोरी आहे. हळूहळू ते रिव्हील होत जातं. काय घडलंय ते सांगणाऱ्या कथानकात मर्डर मिस्ट्रीचा समावेश कसा झाला हे उलगडत जातं.

  ही अभिची स्ट्रॅटेजी
  स्टोरी वास्तवात घडलेली नाही, पण अभिच्या वाचनात आणि ऐकण्यात वनलाईनर आलं होतं. त्यावरून त्यानं संपूर्ण स्टोरी क्रिएट केली. मला आजही आठवतंय की, ते दिवस आमचे नवीन लग्नाचे होते आणि त्याला ती स्टोरी लिहून काढायची होती. इतरही कामं करत तो लिहायचा. मी त्याला आठवण करून द्यायचे की पुढल्या महिन्यात आपण शूट करणार आहोत आणि तू अद्याप स्क्रीनप्ले लिहिलेला नाहीस. मग तो रात्र-रात्र जागून स्क्रीनप्ले लिहायचा. एखादा इंटरेस्टिंग सीन सुचला की रात्री मला उठवायचा. त्यानं मला तितकाच पोर्शन नॅरेट केला ज्यात मी नाही. मी तुझा पोर्शन नॅरेट करणार नाही असं म्हणायचा. मी ओके म्हणायचे, पण स्टोरीचा एंड त्यानं मलाच काय कोणत्याही कलाकाराला सांगितला नाही. त्याला वाटत होतं की, मी जर नॅरेट केलं तर सर्वांच्या प्रतिक्रिया येतील आणि ते त्याला नको होतं. डायरेक्ट शूट करायला गेल्यावर आम्हाला एंड समजला. ही त्याची स्ट्रॅटेजी होती. अभिनय क्षेत्रातील कलाकार म्हणून कधी कधी आपण प्रिटेंट करतो आणि तसाच अभिनय करतो. ते त्याला नको होतं.

  साक्षी वकीलचं कॅरेक्टर
  अशी प्रार्थना आजपर्यंतच्या कुठल्याही चित्रपटात प्रेक्षकांनी पाहिलेलं नसेल. असं कॅरेक्टर मी आजपर्यंत कधीही केलं नाही. यात मी साक्षी नावाच्या तरुणीची भूमिका साकारली आहे. हि तीन मुलींची स्टोरी आहे. मुंबईत रूम मेट्स म्हणून एकत्र रहाणाऱ्या तीन मुलींसोबत एका रात्री असं काहीतरी घडतं, ज्यामुळं त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलतं. ते काय घडतं ते म्हणजे ‘ग्लिटर’ची स्टोरी आहे. साक्षी ही व्यवसायानं वकील आहे. तीन मुलींपैकी साक्षीचं कॅरेक्टर मॅच्युअर आणि सेटल आहे. वकील असल्यानं खूप हुषार आहे. तिला कायदे माहित आहेत. अशी मुलगी एका प्रकरणात अडकल्यानंतर कशा प्रकारे त्यातून बाहेर पडते ते या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.

  मर्डर, मिस्ट्री, इन्व्हेस्टिगेशन ड्रामा
  वकीलाची भूमिका प्रथमच साकारली आहे. इतकं मॅच्युअर कॅरेक्टरही प्रथमच केलं आहे. इतकं सखोल कॅरेक्टर आणि अशा प्रकारच्या स्टोरीचाही मी प्रथमच एक भाग बनले आहे. मोस्टली मी रोमँटिक फिल्म्स केल्या आहेत. कुठलीही थ्रिलर, मर्डर, मिस्ट्री काही केलेलं नाही. ही वेब सिरीज म्हणजे मर्डर मिस्ट्री इन्व्हेस्टिगेशन ड्रामा आहे. त्यामुळं यात काम करणं खूप चॅलेंजीग होतं.वास्तववादी आहे.

  साक्षीसारखी प्रार्थना नाही
  अभिची एक फ्रेंड वकील आहे. तिच्याकडून वकीलांची शैली शिकले. त्यांची वागण्याची पद्धत, बोलण्याची शैली, कॉन्फिडन्स लेव्हल आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. नवराच लेखक-दिग्दर्शक असल्यानं त्याच्या डोक्यात खूप सर्व गोष्टी होत्या. ते कॅरेक्टर कागदावर घडवताना त्याच्या मनात काही गोष्टी होत्या. त्या त्यानं मला समजावून सांगितल्या होत्या. तो मला सतत म्हणायचा की, माझ्या बायकोसारखी साक्षी मुळीच नाही. साक्षी असं करेल, साक्षी तसं करेल. त्यामुळं तू असं वाग. काही कपड्यांमध्ये मी कम्फर्टेबल नव्हते, पण वकील असल्यानं मला त्यानं ते घालायला लावले. त्यानं खूप सपोर्ट केला.

  म्हणून मी त्याच्या प्रेमात आहे
  अभि दिग्दर्शक म्हणून खूप स्ट्रीक्ट आहे. नवरा म्हणून माझ्या सर्वच गोष्टी ऐकतो आणि सर्वच गुडी-गुडी आहे, तितका डायरेक्टर म्हणून मुळीच नाही. सेटवर जर मला मस्तीचा मूड असला आणि मी जर मस्ती केली तर तो चिडायचा. तू कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन उगाच मस्ती करू नकोस असं म्हणायचा. आपण इथं काहीतरी सिरीयस करतोय. त्यामुळं सेटवर तो चिडेल याची भीती कायम वाटायची. तो त्याच्या कामात खूप पर्टिक्युलर आहे. माझ्याहून त्याचं त्याच्या कामावर जास्त प्रेम आहे. हिच त्याची गोष्ट मला आवडते आणि म्हणून मी त्याच्या प्रेमात आहे. कारण मीसुद्धा वर्कोहोलिक आहे. मी कामात वेडी झाले की आजूबाजूला लक्ष नसतं. तो माझ्यापेक्षा दोन पावलं पुढे आहे.

  रेड बल्ब मुव्हीजची निर्मिती
  आमच्या रेड बल्ब मुव्हीजच्या बॅनरखाली ‘ग्लिटर’ची निर्मिती करण्यात आली आहे. हिंदीमध्ये ‘मिसिंग ऑन अ विकेंड’ आणि वैभव तत्त्ववादी अभिनीत ‘ग्रे’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केल्यानंतर अभिननं आता या वेब सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. या तीनही मर्डर मिस्ट्री आहेत. स्वत:चं प्रोडक्शन असल्यानं पहिल्यांदा प्रोड्युसरची बाजू कळली. या निमित्तानं प्रोड्युसरची दुखणी समजली. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. विभा आनंद, सोनिया बलानी, कन्नन अरुणाचल, अविनाश नारकर, भूषण तेलंग, पंकज विष्णू, अश्विनी कुलकर्णी, शिवा डागर, अभिषेक तिवारी आदी कलाकार यात आहेत. मुंबई आणि नाशिकमध्ये याचं शूट झालं आहे.