shraddha bhagat and pratik gautam in fatwa

नव्याने प्रेमाची चाहूल लागलेल्या प्रेमवीरांची गोष्ट घेऊन ‘फतवा’ (Fatwa) हा संगीतमय प्रेमपट ९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

    प्रत्येकाच्याच प्रेमाची एक वेगळी गोष्ट आहे. प्रेम कोणी आणि कोणावर केल यावर ते चूक की बरोबर? हे नाही ठरवता येत. नव्याने प्रेमाची चाहूल लागलेल्या प्रेमवीरांची गोष्ट घेऊन ‘फतवा’ (Fatwa) हा संगीतमय प्रेमपट ९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ब्ल्यु लाईन फिल्मस् प्रस्तुत आणि प्रतिक गौतम (Pratik Gautam) दिग्दर्शित या संगीतप्रधान चित्रपटातून प्रतिक गौतम आणि श्रद्धा भगत (Shraddha Bhagat) ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर येत आहे. डॉ.यशवंत, प्रेमा निकाळजे, अनुराधा पवार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

    नाट्यस्पर्धेत लहानपणापासून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारा अभिनेता प्रतिक गौतम याने आजवर एकांकिका, शॉर्टफिल्म यांचे लेखन, दिग्दर्शन व अभिनेता म्हणून काम केले आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या काहुर या लघुपटाला दिल्ली फिल्म फेस्टिवल- २०१६ व जयपूर फिल्म फेस्टिवल- २०१६ मध्ये प्रथम पारितोषिक मिळाले आहे. ग्रामीण भागातल्या प्रतिकने मेहनतीने आपल्या इंजीनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. ग्रामीण भागातून येऊन स्ट्रगल करून, चित्रपट क्षेत्राशी काही संबंध नसलेला सामान्य कुटुंबातील पूर्णपणे ‘नॉन फिल्मी बॅकग्राऊंड’ असलेला प्रतिक एक बिगबजेट मुव्ही करतो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येऊन इथे उभा राहतो ही विशेष गोष्ट आहे.

    श्रद्धा भगत ‘फतवा’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी श्रद्धाची ख़ास अभिनयाची कार्यशाळा घेण्यात आली. या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या जोडीची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर आपली कमाल दाखवायला सज्ज झाली आहे.

    ‘फतवा’ चित्रपटाचे संगीत विविध शैलींचा अनोखा अनुभव देणारे आहे. वेगवेगळ्या जॉनरच्या सहा सुमधुर गाण्यांचा नजराणा यात असून विशेष म्हणजे अराफत मेहमूद यांनी गीत-संगीतबद्ध केलेले ‘अली मौला’ ही साबरी ब्रदर्स यांनी गायलेली कव्वाली या चित्रपटाचे खास आकर्षण आहे.

    रवि आणि निया यांच प्रेम त्यांना मिळणार की त्यांना विरह सहन करावा लागणार? याची कथा ‘फतवा’ चित्रपटात बघायला मिळणार आहे. या नव्या जोडीसोबत छाया कदम, मिलिंद शिंदे, नागेश भोसले, संजय खापरे,अमोल चौधरी, निलेश वैरागर, पूनम कांबळे, निखिल निकाळजे, निकिता संजय हे कलाकार ‘फतवा’मध्ये दिसणार आहेत.