pushpa premier in russia

सुकुमारद्वारा लिखित आणि दिग्दर्शित ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa : The Rise) या ॲक्शन ॲडव्हेंचर चित्रपटाने रशियात होणाऱ्या भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे.

    भारतीय चित्रपट महोत्सवाचा (Indian Film Festival) पाचवा वर्धापन दिन १ ते ६ डिसेंबर दरम्यान रशियातील (Russia) २४ शहरांमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन चित्रपट कंपनी (इंडियन फिल्म्स)द्वारा भारतीय राष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र (एसआयटीए) (SITA) यांसोबत मिळून, रशियन फेडरेशनचे मिनिस्ट्री ऑफ कल्चर तसेच रशियातील भारतीय दूतावासाच्या सहकार्याने केले जाईल. मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग, सोची आणि अनेक शहरांमध्ये राष्ट्रीय सिनेमा नेटवर्क (सिनेमा पार्क) मध्ये स्क्रीनिंगचे आयोजन केले जाईल. या कार्यक्रमात करण जोहरच्या ड्रामासह भारतीय चित्रपटसृष्टीतील ६ हिट चित्रपटांचा समावेश असून, यामध्ये रशियात सर्वात जास्त आवडला जाणारा म्युझिकल मेलोड्रामा चित्रपट ‘डिस्को डान्सर’चा देखील समावेश आहे. तसेच, सुकुमारद्वारा लिखित आणि दिग्दर्शित ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa : The Rise) या ॲक्शन ॲडव्हेंचर चित्रपटाने महोत्सवाचा शुभारंभ होईल.

    भारतीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन समारंभ १ डिसेंबर रोजी मॉस्को येथील ‘ओशनिया’ शॉपिंग सेंटर येथे होईल. ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाचे लेखक आणि मुख्य कलाकार वैयक्तिकरित्या सादर करतील ज्यामध्ये मेगा-स्टार आणि पुरस्कार विजेता अभिनेता अल्लू अर्जुन, मॉडेल आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सुकुमार आणि निर्माता रविशंकर यांचा समावेश आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभासाठी टोड्स बॅलेचे संस्थापक आणि दिग्दर्शक अल्ला दुहोवा यांनी ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाच्या साउंडट्रॅकसाठी एक आकर्षक नृत्यदिग्दर्शन केले आहे. तसेच, ३ डिसेंबर रोजी ‘पुष्पा: द राइज’चे सर्व कलाकार आणि क्रू सदस्य सेंट पीटर्सबर्ग येथील ‘गॅलेरिया’ शॉपिंग सेंटर येथे चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उपस्थित राहतील.

    या चित्रपट महोत्सवात सुकुमारद्वारा दिग्दर्शित ‘पुष्पा: द राइज’ (२०२१) या चित्रपटाचा समावेश असून, इतर लोकप्रिय भारतीय चित्रपटांमध्ये करण जोहर दिग्दर्शित ‘माय नेम इज खान’ (२०१०), बब्बर सुभाष दिग्दर्शित ‘डिस्को डान्सर’ (१९८२), एसएस राजामौलीचा ‘आरआरआर: राइज रोअर रिवोल्ट’ (२०२२), ‘दंगल’ (२०१६), सिद्धार्थ आनंदचा ‘वॉर’ (२०१९) या चित्रपटांचा देखील समावेश आहे.