भरत जाधव यांच्यावर शिवसेनेच्या मंत्र्याचा पलटवार, “ते” न आल्यामुळे सांस्कृतिक चळवळ थांबत नाही.. तर “सेनेच्या मंत्र्याने केला गुणी कलाकाराचा अपमान” केल्याचं सुषमा अंधारेंचं ट्विट

अभिनेता भरत जाधव यांनी रत्नागिरीतील नाट्यगृहाच्या दुरावस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही असंही भरत जाधव यांनी म्हटलं होतं. यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी पलटवार केला आहे.

    Marathi Drama : रत्नागिरीतल्या नाट्यगृहातील (Ratnagiri theatre) एसी आणि साऊंड सिस्टिंमवरून अभिनेता भरत जाधव यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही, असंही भरत जाधव (Bharat Jadhav) यांनी म्हटले होते. त्यावरून अनेकांनी नाराजीचा सूर आवळला होता. यावर उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. नाट्यगृहातील त्रुटी दूर करण्यात येतील. तसेच भरत जाधव यांनी आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा माफी मागत असताना तिकीटाचे पैसे परत करायला हवे होते. त्यांच्या ज्या काही सूचना होत्या त्याबद्दल माझ्याशी बोलायला हवं होतं असंही उदय सामंत यांनी म्हटलं.

    मात्र, रत्नागिरीत परत पाय ठेवणार नाही असं म्हणणं कितपत योग्य आहे? ते न आल्यामुळे सांस्कृतिक चळवळ काही थांबत नाही असा टोला लगावला आहे. उदय सामंत म्हणाले, ” मी सुद्धा सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वर्ष काम करत आहे, या सगळ्यांना अनेक वर्ष पाहिलं आहे. “आता वि.दा.सावरकर नाट्यगृहात अतिशय चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. भरत जाधव यांच्या नाटकाच्या आधी तीन दिवस मी त्याच ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांबरोबर कार्यक्रमासाठी होतो त्यावेळेला एसी चा कोणताही त्रास आम्हाला झाला नाही त्यामुळे आहे त्यापेक्षा उगाचच काहीतरी मोठे झाले आहे असं करून आविर्भाव आणत दाखवणं हे योग्य नाही अशा शब्दात उदय सामंत यांनी सुनावले आहे. भरत जाधव मला कॉल करून बोलू शकले असते आठवड्या भरापूर्वी बेंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमात भरत जाधव माझ्यासोबत होते. त्यासाठी त्यांना असा इव्हेंट करण्याची आवश्यकता नव्हती पण तो शेवटी त्यांचा प्रश्न आहे.”

    उदय सामंत यांच्या या प्रतिक्रियेवर शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विटरमध्ये म्हटलं आहे की, “भरत जाधव यांनी नाट्यगृहात एसीबाबत संविधानिक शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यावर ‘प्रेक्षकांची माफी, त्यांचे पैसे परत केले का?, तुम्ही न आल्याने सांस्कृतिक चळवळ थांबणार नाही’ बोलत एका प्रामाणिक गुणी कलाकाराचा अपमान @samant_uday यांनी केला. हे खेदजनक आहेत. @ShivSenaUBT_ @AUThackeray”

    आता हे प्रकरण काय वळण घेणार ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. मात्र, नाट्यगृहातील त्रुटींवर योग्य तो तोडगा काढावा अशी नाट्यरसिकांची अपेक्षा आहे हेसुद्धा तितकंच खरं.