रेणू सावंत यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील १० प्रतिभावंतांमध्ये स्थान!

रेणू यांनी 'एरावत' आणि 'अरण्यक' हे काल्पनिक लघुपट सादर केले होते. या दोन लघुपटासाठी २०११ व २०१५ मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.

    चित्रपट-दिग्दर्शिका रेणू सावंत यांनी मिऱ्या येथे राहून चित्रपट व माहितीपट चित्रित करून दोनवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. ब्रिटिश अॅकॅडमी ऑफ फिल्म अॅण्ड आर्टस् बाफ्ताने यावर्षी निवडलेल्या भारतीय दहा प्रतिभावंतांमध्ये त्यांना स्थान मिळालं आहे.

    रेणू सावंत यांनी मिऱ्या येथे चित्रित केलेला ‘द इब्ब टाईड’ हा माहितीपट बाफ्ताच्या स्पर्धात्मक उपक्रमासाठी सादर केला होता. या उपक्रमांतर्गत चित्रपट, क्रीडा व टेलिव्हिजन या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीकडून अर्ज मागवले होते. रेणू यांनी सादर केलेल्या ‘दी इब्ब टाईड’ या माहितीपटाने नामवंत परीक्षकांची पसंती मिळविली. संगीतकार ए. आर. रेहमान, ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर, मोनिका शेरगिल, मिरा नायर, सिद्धार्थ रॉय कपूर या दिग्गजांचा सहभाग असलेल्या परीक्षक मंडळाने देशभरातील प्रतिभावंतांनी केलेल्या सादरीकरणातून दहा मोहरे निवडले.

    रेणू यांनी ‘एरावत’ आणि ‘अरण्यक’ हे काल्पनिक लघुपट सादर केले होते. या दोन लघुपटासाठी २०११ व २०१५ मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. केरळमधील आंतराष्ट्रीय लघुपट, माहितीपट महोत्सवातील विशेष उल्लेखनीय अॅवॉर्ड एफटीआयआयचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी किताब, थर्ड आय एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार अशा अनेक पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. २०१९ ला त्यांनी येथील मिऱ्या गावातच ६० मिनिटाचा ‘द इब्ब टाईड’ हा दुसरा माहितीपट चित्रित केला. यासाठी त्यांना नवी दिल्लीतील ट्रस्टची फेलोशिप मिळाली. विशेष म्हणजे हा माहितीपट जर्मनीतील डोक लेपझिंग फिल्म फेस्टिवलसाठी निवडला गेला होता.

    मुंबईत पुढील शिक्षण घेताना मिऱ्या या मूळ गावात ‘मेनी मन्थ इन मिऱ्या’ हा माहितीपट चित्रित केला. पश्चिम किनारपट्टीवरील हे गाव आणि तेथील लोकजीवनाचा हा माहितीपट. २०१७ मध्ये माहितीपटाने सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी अब्राहम नॅशनल अॅवॉर्ड पटकावले होते. पदवी घेतल्यानंतर मिऱ्या गावात पहिला ‘मेनी मन्थ इन मिऱ्या’ आणि त्यानंतर याच ठिकाणी ‘द इब्ब टाईड’ ही फिल्म बनवली. मी माझ्या भूमीत कोकणात करत असलेल्या वेगवेगळ्या चित्रपट निर्मितीची बाफ्ताने दखल घेल्याचा आनंद होत असल्याचे रेणू सावंत यांनी सांगितले.