रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

'वेड' हा चित्रपट ३० डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मंगळवारी झालेल्या ट्रेलर लाँचच्यावेळी अभिनेता रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, अजय अतुल, जिया शंकर, शुभंकर तावडे, रवी राज कांडे, जितेंद्र जोशी इत्यादी उपस्थित होते.

    मुंबई : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याने दिग्दर्शित केलेला पहिला मराठी सिनेमा ‘वेड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज मंगळवारी १३ डिसेंबर रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलर लाँचच्यावेळी चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट उपस्थित होती. ‘वेड’ हा रोमॅंटिक चित्रपट असून यात रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसुझा देशमुख हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

    ‘वेड’ हा चित्रपट श्रावणी आणि सत्या या दोन पात्रांच्या अनोख्या प्रेम कहाणीवर आधारित आहे. या चित्रपटाला अजय अतुल या प्रसिद्ध संगीतकार जोडीचे संगीत लाभले असून या चित्रपटातील ‘वेड तुझा’ आणि ‘बेसुरी’ ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. याचित्रपटात जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची देखील महत्वाची भूमिका असून नवोदित अभिनेत्री जिया शंकर ही या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बॉलिवूडचा दबंग सलमान खान हा देखील एका गाण्यात पाहुण्या कलाकार म्हणून दिसणार आहे.

    ‘वेड’ हा चित्रपट ३० डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मंगळवारी झालेल्या ट्रेलर लाँचच्यावेळी अभिनेता रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, अजय अतुल, जिया शंकर, शुभंकर तावडे, रवी राज कांडे, जितेंद्र जोशी इत्यादी उपस्थित होते.