‘तुम मेरे शब्द याद करोगे. एक टाईम ऐसा आएगा की…’सचिन पिळगावकरांनी सांगितली दिलीप साहेबांची आठवण

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर अभिनेते- निर्माते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी दिलीप साहेबांच्या आठवणी नवराष्ट्रबरोबर शेअर केल्या.

    बालपणापासून मी दिलीपसाहेबांचा फॅन आहे. त्यांचे चित्रपट पहात आलो आहे. त्यांना भेटण्याची संधी हवी होती आणि इच्छाही होती. चोप्रासाहेबांच्या ‘दास्तान’ या चित्रपटात मी त्यांच्या बालपणीचा रोल केला, पण त्यांना भेटण्याची संधी मिळाली नाही. कारण मी काम करत असताना त्यांचं काम नसायचं. त्यामुळं त्यांना भेटण्याची माझी इच्छा अधूरी राहिली. त्यानंतर काही वर्षांनी एक चित्रपट बनला. त्याचं नाव होतं ‘बैराग’. या चित्रपटातही मला त्यांच्या बालपणीची भूमिका साकारण्याची आॅफर आली. त्याचं सिलेक्शन करायला दिलीपसाहेबांनी मला त्यांच्या घरी बोलावलं होतं. त्यांचं बालपण साकारणारा मुलगा कोण आहे हे त्यांना पहायचं होतं. मी त्यांच्या घरी गेलो आणि तिथं माझी त्यांच्याशी पहिली भेट झाली.

    त्यांनी माझ्यासोबत खूप छान वेळ घालवला. काय केलंस, काय करतोय, किती हिरोंचं बालपण केलं याबाबत त्यांनी विचारलं. मी म्हटलं मी जास्त करून मेन रोल केलेले आहेत. बालपण खूप कमी केलंय हे सांगितल्यावर त्यांना थोडं आश्चर्य आणि कौतुकही वाटलं. त्यामुळं त्यांनी या चित्रपटासाठी माझीच निवड केली. या चित्रपटात मला त्यांच्यासोबतही काम करायला मिळालं. कारण यात ते वडीलही होते आणि मुलगाही. या चित्रपटात त्यांचा ट्रीपल रोल होता. त्यामुळं त्यांच्यासोबत काम करण्याची संधीही मिळाली. त्यांच्यासोबत बसून गप्पासुद्धा मारू शकलो. त्यांच्याकडून काही गोष्टी शिकू शकलो. युसूफभाई नेहमी लहानांना प्रोत्साहन द्यायचे. हा त्यांचा एक सद्गुण होता.

    मला अजूनही आठवतं की एका फिल्मफेअर फंक्शनला मी एक डान्स केला होता. ही १९७६-७७ ची गोष्ट आहे. त्या फंक्शनला युसूफसाहेबही होते आणि सायराआपाही होत्या. त्या फंक्शनहून ते रात्री घरी उशीरा पाहोचले असावेत. घरी पोहोचल्यावर त्यांचा रात्री दोन वाजता मला फोन आला. माझ्या वडीलांनी फोन घेतला. दिलीपकुमार फोनवर असल्याचं समजलं, तेव्हा वडीलांनी मला झोपेतून जागं केलं. मी फोन घेतला. ते म्हणाले, ‘सचिन, तुम्हारा डान्स मैने देखा. तुम अभी सब कुछ छोडो. अॅक्टिंग छोडो और डान्स पर कॅान्सन्ट्रेट करो.’ मी म्हणालो की, अॅक्टिंग सोडून फक्त डान्स कसा करू. इतक्या वर्षांपासून अॅक्टिंगच करतोय. त्यांचं म्हणणं असं होतं की, ‘तुम मेरे शब्द याद करोगे. एक टाईम ऐसा आएगा की पूरा देश तुम्हे डान्स के लिए जानेगा.’ त्यावेळी आपण पुढे डान्समध्ये नाव कमवू असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. सुप्रियासोबत मी २००५ मध्ये ‘नच बलिए’ जिंकेन याची मला त्यावेळी कल्पनासुद्धा नव्हती. त्यांनी मला अशी काही मनापासून कॅाम्प्लिमेंट दिली की ती खरी झाली. माझे खूप लाडही केले. त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला एकदा घरी गेलो होतो, तेव्हा ते लोकांना जास्त ओळखत नव्हते, पण मला ओळखलं. सायराआपांनी त्यांची खूप काळजी घेतली. ज्या श्रद्धेनं त्यांनी दिलीपसाहेबांसाठी सारं काही केलं त्याला खरंच माझा सलाम आहे. जीवनसंगीनी कोणाला म्हणतात त्याचं उदाहरण सायराआपा आहेत.