मोठी बातमी! आता मुंबई क्राइम ब्रँच हाताळणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण

सलमानचे प्रकरण आता शहर पोलिसांकडून मुंबई क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आले आहे. पोलीस अजूनही तपास करत आहेत.

  मुंबई : रविवारी पहाडेच्या सुमारास अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडल्याचा प्रकार  (Salman Khan House Firing News) घडला. या घटनेनं मनोरंजन सृष्टी हादरली आहे. या दुचाकीस्वारांचे फोटोही समोर आले. आता या प्रकरणी पोलिस तपास सुरू असताना एक मोठी अपडेट समोर येत आहे. रिपोर्टनुसार,  हे प्रकरण आता मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं आहे.

  दुचाकीस्वारांनी केलेला गोळीबार पूर्वनियोजित?

  रिपोर्टनुसार, आता या घटनेच्या तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या दहाहून अधिक पथके तैनात करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वारांनी केलेला गोळीबार पूर्वनियोजित असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. आरोपींनी चार राऊंड फायर केले  आणि पळ काढला. पोलिसांना तपासादरम्यान घटनास्थळावरून एक जिवंत काडतूस मिळाले आहे. गोळीबाराच्या घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. आरोपी कोठून आले, त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींची छायाचित्रे समोर आली आहेत.

  राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला

  सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त मित्र आणि राजकारणीही त्याला भेटायला आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरेही सलमानला भेटायला आले होते. याशिवाय सलमानची बहीण अर्पिता खान शर्मा, भाऊ सोहेल आणि अरबाज खानही घरी पोहोचले. या घटनेनंतर सलमानच्या वडिलांनी या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होण्याचे संकेत दिले आहेत. त्याला आपल्या मुलाची खूप काळजी आहे.

  बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी

  या गोळीबार प्रकरणात बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता. यामुळे या प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्यात आला आहे. दरम्यान, अनमोल बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र हे अकाउंट फेसबुक वर सर्च केलं जाऊ शकत नाही. अकाउंटबाबत रिस्ट्रीक्शन्स आहेत. पोलीस याची सत्यता पडताळून पाहत आहेत.