लॉरेन्स बिश्नोई टोळीतील ‘या’ सदस्याने सलमान खानच्या घरावर केला गोळीबार, सीसीटिव्हीत दिसला हल्लेखोराचा चेहरा!

अमेरिकेत राहणारा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने फेसबुकच्या माध्यमातून सलमान खानला इशारा दिला होता. त्यांनी या घटनेला पहिला आणि शेवटचा इशारा म्हणून वर्णन केले.

  बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान रविवारी सकाळपासूनच चर्चेत आहे. त्याच्या घराबाहेर दोन जणांनी गोळीबार केला. हल्लेखोरांनी सलमानच्या घराबाहेर म्हणजेच गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये हवेत तीन राऊंड गोळीबार (salman khan house firing case) केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आता या घटनेचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील सदस्यांनी अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार केला आहे. गुरुग्राममधील कालू नावाचा आरोपी या प्रकरणात सामील असल्याचे वृत्त आहे.

  सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद शूटरचा चेहरा

  नवीन सीसीटीव्ही फुटेजमध्ये, मोटारसायकलवरील दोन पुरुष सलमानच्या घरासमोर येताच हळू हळू चालत असल्याचे दिसून येते. व्हिडिओमध्ये बंदुकीतुन तीन वेळा गोळ्या झाडताना दिसत आहे. एक व्यक्ती बाईकवर बसलेला असतो आणि दुसऱ्याने अभिनेत्याच्या घरावर गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही हल्लेखोर दुचाकी सोडून मुंबईतून पळून गेले.

  मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा हल्ला राजस्थानमधील बिश्नोई गँगशी संबंधित रोहित गोदाराने केला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. संशयितांपैकी एकाचे नाव विशाल असे असून तो कालू या नावाने प्रसिद्ध आहे. तो रोहित गोदारासाठी काम करतो, असे बोलले जात आहे. रोहित हा राजस्थानच्या बिश्नोई टोळीचा सदस्य आहे.

  अनमोल बिश्नोईने घेतली जबाबदारी

  मुंबई पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही संशयित मुंबईतून दुचाकी सोडून पळून गेले आहेत. सुरुवातीला हल्लेखोरांबद्दल कोणताही सुगावा लागला नसला तरी नंतर हल्लेखोर लॉरेन्स बिश्नोईच्या माफिया संघटनेशी जोडले गेले, ज्याने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. अमेरिकेत राहणारा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने फेसबुकच्या माध्यमातून सलमान खानला इशारा दिला होता. त्यांनी या घटनेला पहिला आणि शेवटचा इशारा म्हणून वर्णन केले.