
गँगस्टर लॉरेन्स म्हणाला की,“सलमानने आमच्या समाजाची माफी मागितली तर ठीक नाहीतर आम्हाला मोठं पाऊल उचलावं लागेल. सलमानला मी धमकी देत नसून विनंती करत आहे. त्याने आमच्या समाजातील लोकांना पैसे देखील दिले आहेत. त्याला आम्ही प्रसिद्धीसाठी नाही तर बदला घेण्यासाठी मारणार आहोत.”
मुंबई: लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखतीमुळे (Lawrence Bishnoi) बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लॉरेन्स बिश्नोईने एका मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे आता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखतीनंतर मुंबई पोलीस (Mumbai Police) सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहेत. सलमानच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लॉरेन्सने एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत सलमानला धमकी दिली होती.
मुलाखतीत गँगस्टर लॉरेन्स म्हणाला की, “सलमानने आमच्या समाजाला चांगली वागणूक दिलेली नाही. त्याने आमच्या भागात येऊन शिकार केली होती. त्यामुळे त्याने आता आमच्या समाजाची माफी मागायला हवी. पण सलमानला मिळालेल्या धमकीच्या पत्राचा आणि माझा काहीही संबंध नाही.” लॉरेन्स पुढे म्हणाला की, “सलमानने आमच्या समाजाची माफी मागितली तर ठीक नाहीतर आम्हाला मोठं पाऊल उचलावं लागेल. सलमानला मी धमकी देत नसून विनंती करत आहे. त्याने आमच्या समाजातील लोकांना पैसे देखील दिले आहेत. त्याला आम्ही प्रसिद्धीसाठी नाही तर बदला घेण्यासाठी मारणार आहोत.”
धमकीचे पत्र
सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे एका बेंचवर बसले त्यांना एक पत्र मिळालं. ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खानला धमकी देण्यात आली होती. या पत्रात लिहिलं होत की, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करुन टाकू. पत्रामध्ये ‘एलबी’ असा उल्लेख होता. एलबी म्हणजे लॉरेन्स बिश्नोई असल्याचा संशय पोलिसांना आहे.
लॉरेन्स बिष्णोईची टोळी
बिश्नोई टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिष्णोई अवघ्या 28 वर्षांचा आहे, तर त्याच्या टोळीतील सदस्य वीस ते पंचवीस वयोगटातील आहेत. मात्र, इतक्या कमी वयात या सर्वांवर हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे नोंद आहेत.