kisi ka bhai kisi ki jaan

‘किसी का भाई किसी की जान’(Kisi ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाच्या टीझरमध्ये सलमानचा ॲक्शन अवतार पहायला मिळतोय. तसेच त्याचे अभिनेत्री पूजा हेगडेसोबत काही रोमँटिक सीन्स आहेत. या व्हिडिओमध्ये ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री शहनाज गिल दिसत आहे.

    अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी आज (25 जानेवारी) हा जास्त आनंद देणारा दिवस आहे. कारण एकीकडे शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दुसरीकडे सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सलमानने 24 जानेवारी रोजी चित्रपटाचा पोस्टर शेअर करत टीझरबद्दलची माहिती दिली होती. अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे.

    सलमान आणि शाहरुखची मैत्री जगजाहीर आहे. बॉलिवूडचा बादशाह आणि भाईजान यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहणं ही चाहत्यांची पर्वणीच असते. अशातच ‘पठाण’सोबत सलमानने त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. या टीझरमध्ये सलमान पुन्हा एकदा दबंग अंदाजात दिसत आहे.

    ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये सलमानचा ॲक्शन अवतार पहायला मिळतोय. तसेच त्याचे अभिनेत्री पूजा हेगडेसोबत काही रोमँटिक सीन्स आहेत. या व्हिडिओमध्ये ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री शहनाज गिल दिसत आहे. शहनाजला साऊथ इंडियन लूकमध्ये पाहून चाहते खुश झाले आहेत. सलमानच्या चित्रपटामुळे तिचं बॉलिवूडमध्ये काम करण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे. शहनाजसोबतच या टीझरमध्ये जस्सी गिल, राघव जुयाल आणि पलक तिवारी हे कलाकारसुद्धा पहायला मिळत आहेत.

    ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात सलमान दोन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट त्याच्या इतर चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात सलमानने अनेक तरुण कलाकारांना संधी दिली आहे. टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. पलक तिवारी आणि शहनाज गिल यांच्याशिवाय चित्रपटात जस्सी गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम आणि बॉक्स विजेंद्र सिंह हेसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. किसी का भाई किसी की जान हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे भाईजानच्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.