खलनायिका राजी साकारल्यानंतर सामंथा दिसणार ‘शकुंतला’च्या भूमिकेत!

सामंथानं मात्र हे साफ खोटं असल्याचं सांगत 'नो फॉर ओटीटी' म्हटलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सामंथा सध्या पती नागा चैतन्य आणि कुटुंबियांसोबत घरीच वेळ घालवत आहे.

    ‘द फॅमिली मॅन २’ या वेब सिरीजद्वारे डिजिटलवर पदार्पण करणाऱ्या सामंथा अक्कीनेनीनं साकारलेल्या खलनायिकेवर सर्वच स्तरांवरून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. खलनायिका असूनही सामंथानं साकारलेल्या राजीनं रसिकांच्या मनात घर केलं आहे. त्यामुळेच ‘द फॅमिली मॅन २’ला मिळालेल्या यशानंतर सामंथा पुन्हा एकदा ओटीटीसाठी प्रोजेक्ट करत असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं.

    सामंथानं मात्र हे साफ खोटं असल्याचं सांगत ‘नो फॉर ओटीटी’ म्हटलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सामंथा सध्या पती नागा चैतन्य आणि कुटुंबियांसोबत घरीच वेळ घालवत आहे. सध्या तरी लवकर कोणतीही वेब सिरीज करणार नसल्याचं सामंथाचं म्हणणं आहे. ‘फॅमिली मॅन २’चे दिग्दर्शक राज निदिमोरू आणि डीके यांच्या अनोख्या दिग्दर्शन शैलीच्या प्रेमाखातर आणि मागील बऱ्याच दिवसांपासून बॅड गर्ल साकारण्याची इच्छा असल्यानं सामंथानं राजीसाठी होकार दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

    ‘फॅमिली मॅन २’च्या निमित्तानं राज-डीके बरोबर काम करण्यासोबतच खलनायिका साकारण्याची सामंथाची इच्छाही पूर्ण झाली आहे. त्यामुळं आता ती आपल्या आगामी चित्रपटांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं समजतं. आता तिला शकुंतला बनण्याचे वेध लागले आहेत. ‘शाकुंतलम’ या तमिळ चित्रपटात ती शकुंतलेच्या रूपात दिसणार आहे.