sandesh jadhav

‘यू मस्ट डाय’ (You Must Die) या सस्पेन्स थ्रिलर नाटकातील त्यांची इन्स्पेक्टरची भूमिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. विशेष म्हणजे आजवर असंख्य वेळा पोलिसांची भूमिका साकारणारे संदेश जाधव (Sandesh Jadhav) रंगमंचावर प्रथमच पोलिसांच्या भूमिकेत दिसत आहेत.

    काही भूमिका करायला मिळणं हे नशिबात असावं लागतं. काही भूमिका कलाकाराला वेगळी ओळख मिळवून देतात. पोलिसांची भूमिका म्हटल्यानंतर काही ठराविक नावे आपसूक डोळ्यासमोर येतात. अभिनेता संदेश जाधव हे त्यापैकीच एक नाव. आजवर चित्रपट व मालिकांमधून त्यांनी पोलिसांच्या भूमिका यशस्वीपणे वठवल्यात. आता रंगमंचावर ही त्यांचा पोलिसी खाक्या बघायला मिळत आहे. ‘यू मस्ट डाय’ (You Must Die) या सस्पेन्स थ्रिलर नाटकातील त्यांची इन्स्पेक्टरची भूमिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. विशेष म्हणजे आजवर असंख्य वेळा पोलिसांची भूमिका साकारणारे संदेश जाधव (Sandesh Jadhav) रंगमंचावर प्रथमच पोलिसांच्या भूमिकेत दिसत आहेत.

    आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना संदेश सांगतात की, चित्रपट व मालिकांमधून पोलिसांची भूमिका करून एक ठपका पडला होता. निदान नाटकात पोलिसांची भूमिका करायची नाही असं ठरवलं होतं. मध्यंतरी व्यावसायिक नाटकांसाठी (Commercial Drama) पोलिसांच्या भूमिकेची विचारणा झाली, पण मी नकार दिला. मात्र ‘यू मस्ट डाय’ या नाटकाची कथा आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्यासोबत काम करायला मिळतंय या गोष्टीने मी रंगमंचावर पोलिसाची भूमिका करायला मला भाग पाडलं. रंगमंचावर लाईव्ह परफॉर्मन्स करायला मिळणं हा एक वेगळा अनुभव असतो. माझ्या या भूमिकेला खूप शेड्स असून लाईव्ह परफॉर्मन्समधून तो दाखविण्याचा आनंद वेगळा आहे. या नाटकाला प्रेक्षक पसंतीची पावती मिळते आहे.

    प्रवेश आणि वरदा क्रिशन्स निर्मित ‘यू मस्ट डाय’ नाटकाची निर्मिती अदिती राव यांनी केली आहे. या नाटकाचे लेखन नीरज शिरवईकर तर दिग्दर्शन विजय केंकरे यांचे आहे. एका रहस्याची, त्या रहस्यामागे असणाऱ्या व्यक्तीचा मागोवा घेताना निर्माण होणारे गूढ ‘यू मस्ट डाय’या नाटकात पहायला मिळणार आहे. संदेश जाधव सोबत या नाटकात शर्वरी लोहकरे, सौरभ गोखले, नेहा कुलकर्णी, अजिंक्य भोसले, हर्षल म्हामुणकर, प्रमोद कदम, विनिता दाते, धनेश पोतदार ही कलाकार मंडळी आहेत.