सतीश कौशिक यांचे शेवटचे ट्विट चर्चेत; तर 2 वर्षांच्या मुलाला गमावल्यानंतर कोसळला दु:खाचा डोंगर…, कसा होता सतीश कौशिक यांचा प्रवास?

सतीश कौशिक यांनी अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात नाव कमावलं. सुरुवातीला अभिनेता, विनोदी कलाकार, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिका त्यांनी लिलया पेलावल्या. पण, वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक दु:खान सामोरं जावं लागलं होतं.

मुंबई : आजची पहाट बॉलिवूडसाठी एक वाईट आणि दुःखद बातमी घेऊन आली. प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे आज पहाटे निधन झाले आहे. (Satish Kaushik Passes Away) हृदयविकाराच्या झटक्याने सतीश कौशिक यांचे निधन झाले. अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी ट्विट करून ही दुःखद बातमी दिली आहे. कौशिक यांच्या निधनानंतर अभिनेता अनुपम खेर यांनी भावनिक ट्विट केलं आहे. ‘मला माहिती आहे, ‘मृत्यू हेच जगाचे अंतिम सत्य आहे!’ पण हे गोष्ट आपला जिगरी दोस्त सतीश कौशक यांच्या निधनबद्दल मी लिहिल, याचा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. ४५ वर्षांच्या मैत्रीवर असा अचानक पूर्णविराम!’ असं ट्विट करत अनुपम खेर यांनी शोक व्यक्त केला आहे. सतीश कौशिक यांची मिस्टर इंडियातील (Mr. India) भूमिका सर्वाधिक गाजली. त्यांना दोन वेळा बेस्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळालेला आहे.

होळीच्या शुभेच्छा ठरले शेवटचं ट्विट…

परवाच म्हणजे मंगळवारी सतीश कौशिक यांनी होळी व धुलीवंदन जोरदार साजरे केले होते. तसेच त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर  शेअर केले होते. सतीश कौशिक यांनी त्यांच्या शेवटच्या ट्वीटमध्ये चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी त्यांनी शुभेच्छा देत म्हटलं होतं, “रंग आणि आनंदाची उधळण करणारा सण. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. जावेद अख्तर यांची जुहू येथील होळी पार्टी. अली फझल आणि रिचा चड्ढा या नवविवाहित जोडप्याचीही भेट झाली.” यावेळी त्यांनी ऐकमेकांना रंग लावले, मजा मस्ती केली तसेच नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी ह्या प्रसंगाचे ट्विट केले ते त्यांचे अखेरचे ट्विट ठरले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

सतीश कौशिक यांचा प्रवास…

सतीश चंद्र कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे झाला. ते प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक होते. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. सतीश कौशिक यांनी त्यांच्या ४ दशकांच्या कारर्किदीत जवळपास १०० चित्रपटात काम केलं. सतीश कौशिक यांनी ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘बधाई हो बधाई’, ‘तेरे नाम’, ‘क्योंकि’, ‘ढोल’ आणि ‘कागज’सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तर ‘मिस्टर इंडिया’, ‘मोहब्बत’, ‘जलवा’, ‘राम लखन’, ‘जमाई राजा’, ‘अंदाज’, ‘मिस्टर और मिसेज खिलाड़ी’, ‘साजन चले ससुराल’, ‘दिवाना मस्ताना’, ‘परदेसी बाबू’, ‘बड़े मियां छोटे मियां’, ‘हसीना मान जाएगी’, ‘राजा जी’, ‘आ अब लौट चलें’, ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘चल मेरे भाई’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण सतीश कौशिक यांची मिस्टर इंडियातील (Mr. India) भूमिका सर्वाधिक गाजली. तसेच चाहत्यांच्या आठवणीत देखील राहिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Satish Kaushik (@satishkaushik2178)

वैयक्तिक आयुष्यात दु:खाचा डोंगर…

सतीश कौशिक यांनी अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात नाव कमावलं. सुरुवातीला अभिनेता, विनोदी कलाकार, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिका त्यांनी लिलया पेलावल्या. पण, वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक दु:खान सामोरं जावं लागलं होतं. सतीश कौशिक यांनी १९८५ साली शशी कौशिक यांच्याशी विवाह केला होता. सतीश कौशिक यांच्या मुलाचं वयाच्या दुसऱ्या वर्षी निधन झालं होतं. छोट्या मुलाच्या निधनामुळे कौशिक यांना मोठा धक्का बसला होता. १९९६ साली त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. या मोठ्या धक्क्यातून त्यांनी स्वत:ला सावरलं होतं. त्यानंतर १६ वर्षांनी २०१२मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांना मुलगी झाली. ५६व्या वर्षी ते पुन्हा वडील झाले. त्यांच्या मुलीचं नाव वंशिका असं आहे. त्यांची मुलगी फक्त ११ वर्षांची आहे. पण वडील निघून गेल्यानं कौशिक कुटुंबावर शोककळा पसरली आहे.