जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान! अशोक मामांनी रसिक प्रेक्षकांचे मानले आभार

जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

  हिंदी मराठी सनतून आपल्या प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाची छाप सोडणारे जेष्ठ अभिनेता अशोक सराफ (Ashok Saraf) यांना  महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण प्रदान करण्यात आला. . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या हस्ते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आलं.  वरळी येथील डोम, एनएससीआय ( नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजता हा सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर, आ. मनिषा कायंदे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

  अशोक सराफ यांनी रसिक प्रेक्षकांचे मानले आभार

  महाराष्ट्रातील एक क्रमांकाचा पुरस्कार तुम्ही मला दिलात, याचा खरोखर आनंद आहे. माझ्या जन्मभूमी आणि कर्मभूमी ने माझा गौरव केला. महाराष्ट्र भूषण मिळणाऱ्यांची यादी भली मोठी. त्यात मला स्थान दिलं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पन्नास वर्षात प्रवासात ज्यांनी मला कळत नकळत का होईना मदत केली आहे, ही सगळी त्यांची किमया आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे रसिक प्रेक्षक. जे आवडलं तर डोक्यावर घेतात. नाही आवडलं तर नाकारतातही. पण मी सुरुवातीपासून रसिकांना काय आवडतं हाच दृष्टीकोन ठेवून काम केलं. रसिकांना आवडलं पाहिजे हाच दृष्टीकोन ठेवला. रसिकांनी प्रेम दिलं. ते उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. माझ्या ह्रदयात हे प्रेम कायम राहील, अशी भावना यावेळी अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

  अशोक सराफ यांचे गाजलेले चित्रपट

  धुमधडाका
  गंमत जंमत
  आयत्या घरात घरोबा
  अशीही बनवाबनवी
  एक उनाड दिवस
  एकापेक्षा एक
  नवरा माझा नवसाचा
  गुपचूप गुपचूप
  एक डाव भुताचा
  एक डाव धोबीपछाड