besharam rang

यशराज फिल्म्सने सोशल मीडियावर शाहरुख खानच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख ‘पठाण’ या चित्रपटाविषयी आणि त्याचे सहकलाकार दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याविषयी बोलतोय.

    अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या 25 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पठाण’मधील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या गाण्यातील काही दृश्यांमध्ये दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. त्यावरून काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. आता शाहरुखने या विषयावर मौन सोडलं आहे. ‘बेशरम रंग’ गाण्याबद्दल शाहरुखची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

    यशराज फिल्म्सने सोशल मीडियावर शाहरुख खानच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख ‘पठाण’ या चित्रपटाविषयी आणि त्याचे सहकलाकार दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याविषयी बोलतोय. शाहरुखने यात म्हटलंय की फक्त दीपिकासारखीच एखादी स्टार ‘बेशरम रंग’ गाण्याला इतक्या छान पद्धतीने सादर करू शकते.

    तो म्हणतो की,“बेशरम रंगसारखं गाणं चित्रित करण्यासाठी तुम्हाला दीपिकाच्या तोडीची अभिनेत्री हवी असते. फक्त गाणंच तिने चांगल्या प्रकारे सादर केलंय असम नव्हे तर एका दृश्यात ती एका मुलाला उचलून त्याला मारते. अशा पद्धतीचे ॲक्शन सीन्स करण्यासाठीही ती खंबीर आहे. ॲक्शन सीन्समध्ये ती माझ्याही पेक्षा जास्त टफ वाटते. अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन फक्त दीपिकासारख्या अभिनेत्रीमध्येच बघायला मिळतं”.

    याशिवाय ‘पठाण’ या चित्रपटामुळे 32 वर्षांपूर्वीचं स्वप्न पूर्ण झाल्याचंही शाहरुखने सांगितलं आहे. “मी 32 वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीत एक ॲक्शन हिरो बनण्यासाठी आलो होतो. मात्र लोकांनी मला एक रोमँटिक हिरो बनवून टाकलं. त्यामुळे मी ॲक्शन हिरो बनू शकलो नाही. मला फक्त ॲक्शन हिरो बनायचं होतं. मी डीडीएलजेवरही (दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे) प्रेम करतो. मला राहुल, राज आणि ती सर्व चांगली मुलं आवडतात. पण मला नेहमीच असं वाटायचं की मी एक ॲक्शन हिरो आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे माझं स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे”, असं तो म्हणाला.