smita patil

स्मिता पाटील यांनी वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मृत्यूनंतर त्यांचे 15 चित्रपट प्रदर्शित झाले. एवढ्या छोट्या कारकिर्दीतही त्यांनी 3 राष्ट्रीय पुरस्कार पटकावले. त्यांना 3 फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले होते. त्यांना भारत सरकारने पद्मश्रीनेही सन्मानित केले होते.

  अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) हे नाव जरी घेतलं तरी त्यांच्या अनेक भूमिका आपल्या डोळ्यासमोरून जातात. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केलं. स्त्रियांची वेगवेगळी रुप तिने सशक्तपणे लोकांसमोर मांडली. आपल्या नैसर्गिक अभिनयाने चित्रपटरसिकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील आजही त्यांच्या चित्रपटाच्या रुपाने जिवंत आहेत. अवघ्या 31 व्या वर्षी जगाचा स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेत या अभिनेत्रीने सगळ्यांनाच हुरहूर लावली. केवळ दहा वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक चित्रपट गाजवले. आज स्मिता पाटील यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने काही गोष्टी जाणून घेऊयात. (Smita Patil Birth Anniversary)

  वृत्तनिवेदक म्हणून केलं होतं काम
  अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात झाला. स्मिता पाटील यांचे वडील राजकीय नेते होते आणि आई समाजसेविका होत्या. चित्रपट विश्वात पदार्पण करण्यापूर्वी स्मिता पाटील दूरदर्शनवर वृत्त निवेदक म्हणून काम करत होत्या. त्यांनी नंतर मग चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. स्मिता यांनी एफटीआयआयमधून अभिनयाचे धडे देखील गिरवले होते.

  पहिल्या चित्रपटातच दाखवली दमदार अभिनयाची चुणूक
  अभिनेत्री स्मिता पाटील यांचा पहिला चित्रपट 1974 मध्ये रिलीज झाला होता. ‘मेरे साथ चल’ नावाचा हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये प्रदर्शित झाला होता. पहिल्याच चित्रपटात त्यांचा अभिनय इतका दमदार होता की, पुन्हा त्यांना मागे वळून बघावं लागलं नाही. त्या एकापाठोपाठ एक दमदार चित्रपट करत राहिल्या. समांतर चित्रपट असो वा मुख्य प्रवाहातील चित्रपट, स्मिता पाटील यांनी प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. त्यामुळेच त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती,  मल्याळम आणि कन्नड सहित 6 भाषांमधल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं.

  स्मिता पाटील यांनी ‘उंबरठा’, ‘मेरे साथ चल’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘द नक्सलाइट्स’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है’, ‘चक्र’, ‘नमक हलाल’, ‘बाजार’, ‘शक्ती’, ‘अर्थ’, ‘अर्ध सत्य’, ‘मंडी’, ‘शराबी’, ‘अनोखा रिश्ता’, ‘मिर्च मसाला’, ‘वारिस’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. या सगळ्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांचे खूप कौतुक झाले.

  राज बब्बर यांच्यासोबत नातं
  ‘भीगी पलके’ या 1982 मध्ये रिलीज झालेल्या सिनेमाच्या शूटिंगवेळी स्मिता आणि राज यांची ओळख झाली होती. काही काळानंतर या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं. राज बब्बर यांचं आधीच लग्न झालेलं होतं. काही काळानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. राज बब्बर त्यांची पहिली पत्नी नादिरा यांना सोडून स्मिता पाटील यांच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहू लागले. त्या दोघांवर खूप टीका झाली. काही काळ लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी लग्न केलं.
  स्मिता आणि राज यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली, पण काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद होऊ लागले होते.

  मुलाच्या जन्मानंतर 15 दिवसांनी मृत्यू
  लग्नानंतर स्मिता पाटील यांना एक मुलगा झाला आणि त्याचं नाव प्रतीक ठेवण्यात आलं. बाळाच्या जन्मावेळी स्मिता यांची तब्येत बिघडली. मुलाच्या जन्माच्या केवळ 15 दिवसांनी 13 डिसेंबर 1986 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. स्मिता पाटील यांनी वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मृत्यूनंतर त्यांचे 15 चित्रपट प्रदर्शित झाले. एवढ्या छोट्या कारकिर्दीतही त्यांनी 3 राष्ट्रीय पुरस्कार पटकावले. त्यांना 3 फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले होते. त्यांना भारत सरकारने पद्मश्रीनेही सन्मानित केले होते.