amala paul

एर्नाकुलममधील तिरुवैरानिकुलम येथील महादेव मंदिर (Mahadev Temple) व्यवस्थापनाने रितीरिवाजाचे कारण देत आणि केवळ हिंदूंनाच मंदिरात प्रवेश असल्याचं दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री अमला पॉलला (Amala Paul) सांगितलं आणि तिला मंदिरात येण्यास मनाई केली.

    अलीकडच्या काळात अभिनेता आणि अभिनेत्रींमध्ये वाद होत असतात. काही वेळा धार्मिक कारणांमुळे कलाकारांचे वाद निर्माण होत आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारदेखील याला अपवाद नाही. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री अमला पॉलच्या (Amala Paul) बाबतीत एक भयानक प्रकार घडला आहे. केरळमधील (Kerala) एका मंदिरात प्रवेश नाकारल्याचा दावा खुद्द अमलानं केला आहे. एर्नाकुलममधील तिरुवैरानिकुलम येथील श्री महादेव मंदिर (Mahadev Temple) व्यवस्थापनाने रितीरिवाजाचे कारण देत आणि केवळ हिंदूंनाच मंदिरात प्रवेश असल्याचं अमलाला सांगितलं आणि तिला मंदिरात येण्यास मनाई केली.

    धार्मिक भेदभावामुळे नाकारला मंदिर प्रवेश
    धार्मिक भेदभावामुळे महादेव मंदिरात प्रवेश करण्यापासून अधिकाऱ्यांनी रोखल्याचा आरोप अमलानं केला आहे. अमला सोमवारी या मंदिरात गेली होती. मात्र मंदिर प्रशासनाने प्रथेचे कारण पुढे करत या मंदिराच्या आवारात फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जातो असं म्हटलं.“मला दर्शन नाकारण्यात आल्याने मंदिरासमोरील रस्त्यावरून देवीचं दर्शन घ्यावं लागलं,”असं तिने म्हटलं आहे. अमला पॉलने मंदिराच्या व्हिजिटर्स रजिस्टरमध्ये या संदर्भातील तिचा अनुभव नमूद केला आहे.

    अमला पॉलचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला आहे. अमलाने आजपर्यंत अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनेता नागा चैतन्य, राम चरण आणि अल्लू अर्जुनसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली आहे. अमला अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटात दिसणार आहे.

    दरम्यान अमलाला मंदिरात प्रवेश नाकारल्यानं या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे. “मला देवीचं प्रत्यक्ष दर्शन घेता आलं नसलं तरी माझ्या आत्म्यानं ते अनुभवलं,” असं अमलानं सांगितलं.

    अमलाचा अनुभव
    अमलाने मंदिराच्या व्हिजिटर्स रजिस्टरमध्ये लिहिलंय की, “2023 मध्ये देखील धार्मिक भेदभाव सुरु आहेत, हे दुःखद आणि निराशाजनक आहे. मी देवीच्या जवळ जाऊ शकत नव्हते, पण दुरून दर्शन घेऊनही त्याची अनुभूती मला येत होती. अशा प्रकारच्या धार्मिक भेदभावामध्ये लवकरच बदल होईल, अशी आशा बा‌ळगते. एक वेळ अशी येईल की धर्माच्या आधारावर भेदभाव न करता आपल्या सर्वांना समान वागणूक दिली जाईल.”