आठवड्यातील प्रत्येक रविवार आता गुन्हेगारांच्या नाकीनऊ आणणार, कारण ते पुन्हा येत आहेत….

महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या रुपात पोहोचवण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने विडा उचलला आहे. 

    स्टार प्रवाहवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेचे नवे एपिसोड्स पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ४ जुलैपासून दर रविवारी रात्री ९ वाजता ‘नवे लक्ष्य’ची टीम गुन्हेगारांच्या नाकी नऊ आणणार आहे. एसीपी अर्जुन करंदीकर, पीआय विक्रांत गायकवाड, पीआय मोक्षदा मोहिते, हेड कॉन्टेबल आप्पा मालवणकर आणि पीएसआय जय दिक्षित या जिगरबाज पोलिसांची टीम नव्या साहसी गोष्टींसह प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे.

    सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य जपत आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक करावं तेवढं थोडं. महाराष्ट्राच्या या खऱ्या सुपरहिरोंचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या रुपात पोहोचवण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने विडा उचलला आहे. पोलीसी चातुर्य व साहस यांच्या जोरावर, अत्यंत शिताफीने घडणार्‍या गुन्ह्याची रोमांचक रितीने उकल करून सांगणारी नवे लक्ष्य ही कथामालिका आहे.

    स्टार प्रवाह प्रस्तुत नवे लक्ष्य या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली आहे. या मालिकेच्या नव्या वेळेबद्दल सांगताना निर्माते आदेश बांदेकर म्हणाले, ‘नवे लक्ष्य आता ४ जुलैपासून दर रविवारी रात्री ९ वाजता भेटीला येणार आहे. पोलीस दलाविषयी आपल्या सगळ्यांनाच आदर आणि अभिमान आहे. महाराष्ट्र पोलिसांचं कौशल्य, चातुर्य आणि त्यांची कर्तव्यतत्परता वाखाणण्याजोगी आहे. वर्दीच्या आतला माणुस आणि त्याचं माणुसपण अधोरेखित करणारं असं हे नवे लक्ष्य आहे. आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याची गोष्ट आपण सहकुटुंब पाहायलाच हवी. तेव्हा पाहायला विसरु नका नवे लक्ष्य ४ जुलैपासून दर रविवारी रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’