आशुतोष आणि तू एकमेकांना डेट करता? चाहत्यांच्या प्रश्नावर अखेर तेजश्रीने दिलं ‘हे’ उत्तर!

काही दिवसांपूर्वी एका फोटोमुळे हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर आता तेजश्रीने यावर खुलासा केला आहे.

  झी मराठीवरील लोकप्रिय मालिका अग्गबाई सासूबाई या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. मालिकेतील बबड्या आणि शुभ्राच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. बबड्याच्या भूमिकेत आशुतोष पत्की तर शुभ्राची भूमिका तेजश्री प्रधानने साकारली होती. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. काही दिवसांपूर्वी एका फोटोमुळे हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर आता तेजश्रीने यावर खुलासा केला आहे.

   

  तर झालं असं….

  २ जूनला तेजश्रीचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने आशुतोषने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवरुन त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. आता तेजश्रीने एका मुलाखतीमध्ये यावर वक्तव्य करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘आशुतोष हा माझा खूप चांगला मित्र आहे. त्यामुळे त्याने माझ्या वाढदिवसानिमित्त एक फोटो पोस्ट केला. मालिका सुरु असताना आमच्यात काही तरी सुरु आहे अशा चर्चा व्हायच्या. त्यामुळे माझ्यासाठी हे काही नवीन नाही. पण आमच्यात मैत्रीपलिकडे काहीच नाही’ असं तेजश्री म्हणाली.

  काय होती पोस्ट

  आशुतोषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तेजश्रीसोबतचा फोटो शेअर करत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘माझी बेस्ट फ्रेंड.. मला तुला सांगायचे आहे की तू माझ्यासाठी खूप काही आहेस. तू मला आतापर्यंत दिलेला पाठिंबा, प्रोत्साहन आणि मी एक चांगला व्यक्ती व अभिनेता होण्यासाठी मला केलेली मदत यासाठी मी मनापासून तुझे आभार मानतो. वाढदिवशी मी तुला दोन टीप्स देतोय. पहिली म्हणजे भूतकाळ विसर कारण आपण तो बदलू शकत नाही. दुसरी टीप म्हणजे गिफ्ट विसरून जा… ते मी तुझ्यासाठी आणलंच नाही. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा’ असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले होते.