kaikla satyanarayan (1)

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते कैकला सत्यनारायण (Kaikala Satyanarayana) यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ तेलुगू अभिनेते कैकला सत्यनारायण (Kaikala Satyanarayana) यांचं आज सकाळी त्यांच्या हैदराबादमधील राहत्या घरी निधन झालं आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती फारशी बरी नव्हती. सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण तेलुगू सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. त्यांच्यावर २४ डिसेंबर रोजी महाप्रस्थानम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

    प्रसिद्ध निर्माते वामसी शेखर यांनी ट्विटरच्या माध्यमातून कैकला सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी दिली आहे. सत्यनारायण यांनी १९६० मध्ये नागेश्वरम्मा यांच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुली आणि दोन मुलं आहेत.

    सत्यनारायण यांच्या निधनाच्या बातमीमुळे तेलुगू चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. कैकला सत्यनारायण यांनी ७७० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. महेश बाबू ते एनटीआर आणि यश या तरुण कलाकारांबरोबरही त्यांनी काम केले आहे.

    अभिनयाबरोबरच सत्यनारायण यांनी निर्मिती क्षेत्रातसुद्धा योगदान दिलं आहे. तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपट KGF चे ते वितरक होते. त्यांनी मछलीपट्टणममधून विभागातून १९९६ मध्ये खासदार म्हणूनदेखील काम केले आहे. गेल्या वर्षीही श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने सत्यनारायण यांना हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.