‘थलायवी’ चा टीझर रिलीज होण्याआधीच कंगनाने शेअर केले फोटो, काहींनी केलं कौतुक तर काहींनी ट्रोल!

थलायवी हा चित्रपट जयललिता यांच्या जीवनावर अधारित असून, एक यशस्वी अभिनेत्री ते महत्वाकांक्षी नेता असा ३० वर्षांचा जीवनप्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.

  आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि ट्विटमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे कंगना राणावत. कंगना लवकरच तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललीता यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. २३ मार्चला कंगनाच्या वाढदिवसाचं निमित्त साधत ‘थलायवी’ या सिनेमाचा पहिला ट्रेलर रिलिज होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. या सिनेमासाठी कंगनाला बरीच मेहनत घ्यावी लागली आहे.

  या सिनेमातील विविध लूकमधील अनेक फोटो कंगनाने आजपर्यंत शेअर केले आहेत. नुकतेच कंगनाने तिच्या थलायवी सिनेमातील काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने भूमिकेसाठी वजन वाढवून ते पुन्हा कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.

  जयललितांच्या प्रत्येक व्यक्तीरेखेला कंगनानं पुरेपुर न्याय दिला आहे. अशा फोटोंमध्ये कंगनाचं शारीरिक परिवर्तन खरोखरच कौतुकास्पद आहे. हे फोटोज ट्विटरवर शेअर करताना कंगना म्हणाली की, “जयललिता यांची थोरगाथा लवकरच सर्व चाहत्यांना पाहायला मिळेल, यासाठी मला खूप आनंद होत आहे.” थलायवीच्या या पात्रांसाठी २० किलो वजन वाढवून नंतर काही महिन्यांत तेवढंच वजन कमी करणं मोठं आव्हान होतं.”

   

  कंगनाच्या या ट्विटनंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. काहींनी तिच्याकडे वजन कमी करण्याचा सल्ला मागितला आहे. तर काहींनी “खोट बोलतेय बॉडीसूट घातलाय.” अशा कमेंट केल्या आहेत.  कंगनाने शेअर केलेल्या फोटोंपैकी पहिले दोन फोटो हे जयललीता या अभिनेत्री असतानाचा काळ दाखवत आहेत. तर तिसऱ्या फोटोत जेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हाचा लूक दिसतोय.

  थलायवी हा चित्रपट जयललिता यांच्या जीवनावर अधारित असून, एक यशस्वी अभिनेत्री ते महत्वाकांक्षी नेता असा ३० वर्षांचा जीवनप्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये जयललिता यांनी जीवनात केलेला संघर्ष आणि त्यांनी मिळवलेलं यश दाखवण्यात आलं आहे.