स्मिता मांजरेकर
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘दि कश्मिर फाईल्स’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमात अनुपम खेर, दर्शन कुमार, अमान इक्बाल यांच्यासह मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकरने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे
पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर भाष्य करतो. सध्या या सिनेमाची खूपच प्रशंसा जरी होत असली तरी या सिनेमाला विरोध करणारा घटक वर्गदेखील पाहायला मिळत आहे. तेव्हा याच निमित्ताने अभिनेता चिन्मय मांडलेकरशी आमचे प्रतिनिधी स्मिता मांजरेकरने केलेली ही
एक्सक्लुसिव्ह बातचीत.
‘दि कश्मिर फाईल्स’ या सिनेमाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता खूपच आनंद होतो आहे. कल्पना नव्हती इतका लवकर हा सिनेमा लोकप्रिय होईल. सुरुवातीला आम्हा सर्वांना वाटलं होतं की, हळूहळू लोक हा सिनेमा पाहतील. पण ज्या पध्दतीने या सिनेमाला प्रेक्षकांनी पहिल्या चार दिवसात प्रतिसाद दिला आहे ते पाहता खूपच आनंद वाटतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या सिनेमाचं कौतुक केलं आहे. हे सारं यश दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रसह आमच्या संपूर्ण टीमचं आहे.
‘राधेश्याम’ X ’दि कश्मिर फाईल्स’
खरंतर ‘बाहुबली’नंतर आपण सगळेच प्रभासचे फॅन्स झाले आहोत. त्याचा ‘राधेश्याम’ सिनेमा ‘दि कश्मिर फाईल्स’ सिनेमाबरोबर रिलीज झाला. दोन्ही वेगवेगळे धाटणीचे फिल्मस आहेत. माझं तर असं मत आहे की, जरी दोन्ही फिल्मस एकाच दिवशी लागले तरी प्रेक्षकांनी ते दोन्ही सिनेमे पाहावेत. खरंतर आमचा सिनेमा ‘राधेश्याम’च्या तुलनेने खूपच छोटा सिनेमा आहे. पण आमचा सिनेमा राधेश्यामसारख्या एका मोठ्या सिनेमासमोर उभा राहू शकला आणि त्याला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे ते पाहून आनंद वाटतो आहे.
सिनेमाच्या विरोधाबाबत
कुठल्याही सिनेमाला विरोध असणं हे काही चूक नाही. कदाचित असंही वाटू शकेल की, हा सिनेमा मला आवडला नाही. पण सिनेमा न पाहणं किंवा न पाहू देणं हे चूक आहे. आपल्या सगळ्यांची आवड-निवड असते. आपल्या सगळ्यांना एखादा चित्रपट आवडू शकतो, त्यात मांडल्या गेलेल्या गोष्टी आवडू शकतात किंवा नाही आवडू शकतात. पण चित्रपट न पाहता किंबहुना त्याच्या रिलीजच्या आधीपासूनच एक वैचारिक असं वातावरण तयार करणं कि हा चित्रपट पाहू नये हे चूकीचं आहे. चित्रपटाचे खेळ बंद पाडणे, चित्रपटगृहात अडचणी निर्माण करणे हेदेखील चूकीचं आहे. मग आपण कुठल्या व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल बोलतोय याचा विरोध करणा-यांनी विचार करावा.
काम न मिळण्याची भिती नाही
हा सिनेमा केल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये काम मिळणार नाही याची मला भिती वाटत नाही. मी देवाचा अत्यंत आभारी आहे की, त्याने मला अशा सिनेमात काम करण्याची संधी दिली. या सिनेमाआधीही मी काम करत होतो आणि या सिनेमानंतरही मी काम करतो आहे. माझं एवढंच मत आहे की, माझ्यासमोर एक भूमिका आहे. ती बाजू कुठेतरी मला पटली. ती बाजू प्रकर्षणाने मांडली जावी असं मला वाटलं आणि मी माझ्यापरीने 100 टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे.
मला थमकीचे फोन नाही आले.
या सिनेमामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना धमकीचे फोन आणि मेसेज आले असं मला कळलं. या सगळ्याला सामोरे जायला विवेक सक्षम आहेत. पण मला कुठल्याही धमकीचे फोन आले नाहीत. पण जर एखाद्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत मजल मारत असाल तर याचा अर्थ कुठेतरी तो म्हणतोय त्याच्यात तुम्हाला तथ्य वाटतंय किंवा त्याची तुम्हाला भिती वाटते आहे. अशावेळी मग तुमचं जे म्हणणं आहे ते खोटं आहे.
घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन
मला या सिनेमातील काही घटना आधीच माहित होत्या. कारण माझे काही मित्र विस्थापित कश्मिरी हिंदू आहेत. पण त्याची दाहकता एवढी आहे हे मला खरंच माहित नव्हतं. मी सर्वप्रथम या सिनेमाची संहिता वाचली, त्या घटना वाचल्या आणि विवेक अग्निहोत्री यांना पहिला प्रश्न विचारला होता की, हे सारं खरं आहे का? तेव्हा विवेक अग्निहोत्री म्हणाले की, जे काही घडलं आहे त्याचं आपण फक्त तीस-चाळीस टक्केच दाखवणार आहोत. जे घडलं त्याकाळात ते याच्यापेक्षा जास्त दाहक आहे. ते आपण नाही दाखवू शकत. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की, आपल्या भारतात साधारण 32 वर्षांपूर्वी घडलेली ही घटना आहे. जी आज पुन्हा घडू नये याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तसंच जर तुम्हाला तुमचा इतिहास माहित नसेल तर मग तो पुन्हा घडू शकतो. पण जर माहिती असेल तर हे पुन्हा घडू द्यायचं नाही याची काळजी घ्यायची आणि तरच मग आपण त्यातून पुढे जावू.
भूमिकेबाबत
मला या सिनेमात रोल मिळण्याचं सगळ्यात जास्त श्रेय जात ते पल्लवी जोशीला. फारुख बिट्टा या भूमिकेसाठी विवेक अग्निहोत्री यांनी काही उत्तर भारतीय अभिनेत्यांची ऑडिशन घेतली होती. पण त्यांना काही मनासारखं पटत नव्हतं. मग पल्लवीने माझं नाव सुचवलं. पण विवेकचा मूळ प्रश्न हा होता की, मी मराठी आहे आणि मला अशी भूमिका जमेल का? पण त्यांनी माझं ऑडिशन घेतलं.
माझा रोल आणि या सिनेमाबाबत सविस्तर सांगितलं. त्यातून माझं सिलेक्शन झालं.
शूटिंगचा अनुभव
आमचं मसूरीला शूटिंग झालं. तसंच श्रीनगरलादेखील काही चित्रीकरण झालं. मी त्याठिकाणी पहिल्यांदा जात होतो. श्रीनगरमध्ये शूटिंग करण्याचा अनुभव खूपच छान होता. आजवर चित्रपटांमधून श्रीनगर पाहिला होता. पण प्रत्यक्ष तिथे जाऊन शूटिंग करणं हा विलोभनीय अनुभव आहे आणि त्याचबरोबर ही जाणीवही झाली की, इतकं हे सुंदर ठिकाण आहे. पण तरीही आजवर ते अप्रगत राहिलं आहे. त्याच मूळ कारणच तिथला दहशतवाद आहे. जो इतक्या वर्षांपासून तिथे फोपावलेला आहे.
भूमिकेची तयारी
माझी भूमिका आहे ही काही रिअल लाईफ कॅरेक्टरचं मिश्रण आहे. ती कोणा एका व्यक्तीवर आधारीत नाहीए. सुदैवाने त्यांचे व्हिडिओ अजूनही आपल्याला पाहता येतात. ते पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, मूळात या सगळ्या गोष्टींची दाहकता किती आहे? त्यानंतर त्या भूमिकेवर काम करणं सोप गेलं. फक्त एक ठरवलं होतं की, कोणाचीही मिमिक्री करायची नाही. नक्कल करायची नाही. त्यांची
मानसिकता समजून घेऊन त्यापध्दतीने आपण काम करायचं. खरंतर जे लोक कोणाचाही जीव घेऊ शकतात ती कशी असतील? हे सारंकाही भितीदायकच आहे. पण त्यांना त्यांच्या कुकर्माची शिक्षा मिळो.
वास्तववादी घटना
या सिनेमात दाखवलेल्या घटना खोट्या नाही आहेत. पण ते याच लोकांबरोबर घडल्या आहेत का? तर नाही.. त्यावेगवेगळ्या लोकांबरोबर घडलेल्या आहेत. आम्ही सिनेमाची कथा सांगताना चार भूमिकेच्या माध्यमातून सांगितली आहे. तसंच आम्ही काही डॉक्युमेंटरी सिनेमा बनवत नाहीए. पण या घटना वास्ववादी आहेत हेदेखील तितकंच सत्य आहे.
अनुपम खेर यांच्याविषयी
अनुपम खेर हे माझे एकीकाळी एनएसडीला शिक्षक होते. ते आम्हाला शिकवायला आले होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल तेव्हापासून आदर आहे. सिनेमातही त्यांनी मला खूप मदत केली. माझे बरेचसे सीन त्यांच्याबरोबर आहेत आणि त्यांनी कुठेही मला असं वाटू दिलं नाही की, मी हिंदी सिनेसृष्टीमध्ये नवा आहे.
सिनेमाला होणारा विरोध आणि पब्लिसिटी
लोकच आता हा सिनेमा चालवतील. गेल्या चार दिवसात या सिनेमाने 41 कोटींच्या गल्ला जमावला. त्यामुळे मला वाटत नाही अजून आम्ही याचं काही प्रमोशन करण्याची गरज आहे. लोकांना हा सिनेमा पाहायचा आहे. लोकांनी मनावर घेतला आहे आणि तो सिनेमा चालेल.
सिनेमा आणि राजकारण
या सिनेमामुळे राजकरण होताना दिसतंय. पण माझं काम सिनेमा बनवणं. त्यात काम करणं. माझं काम राजकारण करणं नाहीए. ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांना राजकारण करू दे. मी सिनेमा करेल. |