द काश्मीर फाईल्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! आता ‘या’ पुरस्कारानं सन्मानित

    मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा ‘द काश्मीर फाइल्स’हा चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. या चित्रपटावर अनेक राजकीय पुढारी टीका करीत असतानाच या सिनेमाला ‘इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार’ सोहोळ्यात ‘गोल्डन फिल्म’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करून याची माहिती दिली आहे.

    ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर करण्यात आलेल्या अत्याचारांवर आधारित आहे. हा सिनेमा २०२२ मधील सर्वात वादग्रस्त ठरला होता. या सिनेमामुळे बरेच वादंग निर्माण झाले पण तरीही सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करत आपला दबदबा कायम ठेवला. आता इंडियन टेलिव्हिजन अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे चित्रपटावर अजून एक मनाचा तुरा रोवला आहे.

    विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं आहे,”#TheKashmirFiles ला गोल्डन पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल @TheITA_Official यांचे आभार… हा लोकांचा सिनेमा आहे. मी फक्त माध्यम आहे… हा पुरस्कार काश्मीर खोऱ्यातील पंडितांना समर्पित करतो”.

    विवेक अग्निहोत्री यांनी पुढे लिहिलं आहे,”भारतीय सिनेमाचा गोल्डन फिल्म म्हणून सन्मान होणं ही आनंदाची बाब आहे. #TheKashmirFiles ला मिळालेला हा पुरस्कार अमानुष अत्याचारांचा सामना करावा लागलेल्या काश्मीर खोऱ्यातील पंडितांना समर्पित करण्यात येत आहे.”