रत्नागिरीत ‘द टॉकींग फ्रेम्स’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन; देश-विदेशातील चित्रपट पाहण्याची संधी

महोत्सवाच्या समारोपात, सर्वोत्कृष्ट लघुपट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, छायाचित्रकार, संगीत, ध्वनीमुद्रक, संकलक यांना गौरवण्यात येणार आहे.

  टीडब्ल्यूजे  इव्हेंट्स आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने  दि. २० ते २२ मे  दरम्यान ‘द टॉकींग फ्रेम्स’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे रत्नागिरी येथील सिटीप्राईड चित्रपटगृह व गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे आयोजन केल्याची माहिती फेस्टिवल डिरेक्टर  प्रसन्न करंदिकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  टीडब्ल्यूजे द सोशल रिफॉर्म्स ही संस्था विविध सामाजिक क्षेत्रात चिपळूण, देवरुख, सातारा व पुणे येथे कार्यरत आहे.  ही संस्था चित्रपट महोत्सवाच्या निमिताने रत्नागिरी येथे आपले कार्य सुरु करीत आहे. रत्नागिरी हे कलेची आणि कलावंतांची कदर करणारे शहर आहे. इथे चित्रपट रसास्वादाची परंपरा सुरु करावी, नाट्य आणि संगीत क्षेत्रासाठी एक हक्काचा प्रेक्षकवर्ग रत्नागिरीत आहे तसाच उत्तम चित्रपटांसाठी देखील चोखंदळ प्रेक्षकवर्ग निर्माण व्हावा, हा या चित्रपट महोत्सवामागील हेतू आहे.

  या महोत्सवाच्या निमिताने लघुपट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यातील निवडक २० लघुपटांचे परीक्षण राष्ट्रीय पारितोषक विजेते दिग्दर्शक सुनील सुकथनकर आणि प्रकाश कुंटे है करणार आहेत. महोत्सवाच्या समारोपात, सर्वोत्कृष्ट लघुपट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, छायाचित्रकार, संगीत, ध्वनीमुद्रक, संकलक यांना गौरवण्यात येणार आहे. महोत्सवात या लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार असून लघुपट बनविणाऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे.

  – चित्रपटविषयक चित्रप्रदर्शन

  या महोत्सवात ‘ कला आरंभ या चित्रकारांच्या चमूतर्फे चित्रपटविषयक चित्रप्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या महोत्सवात सुनील सुकथनकर, अनिरुद्ध सिंग, प्रकाश कुंटे, शरीफ ईसा हे दिग्दर्शक आणि चित्रपटातील कलावंत उपस्थित राहणार आहेत. या चित्रपट महोत्सावाचे आयोजन संतोष पाठारे, शोनील येलटीकर, प्रसन्न करंदिकर यांनी केले आहे. तसेच टीडब्ल्यूजे इव्हेंट्स या महोत्सवाच्या तांत्रिक बाजू सांभाळत आहेत .

  – महोत्सवात दाखवले जाणारे चित्रपट

  या महोत्सवात गिल्टी (डॅनीश) ला मिझरेबल (फ्रेंच), यंग (फ्रेंच) या कान आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पारितोषिक विजेते चित्रपट तसेच निवास (मराठी), आदाल ( मल्याळम), सुमित्रा भावे एक समांतर प्रवास (मराठी माहितीपट) यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. महोत्सवाचा समारोप प्रकाश कुंटे दिग्दर्शित शक्तीमान या अप्रदर्शित चित्रपटाने होणार आहे. महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी सिटीप्राईड, रत्नागिरी तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे दि .१५ मे पासुन सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू रहाणार आहे.