‘जून’रंगी रंगली नेहा!

'जून' हा मराठी चित्रपट ३० जून रोजी प्लॅनेट मराठीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं औचित्य साधत 'नवराष्ट्र'शी संवाद साधताना नेहानं 'जून'च्या अनोख्या रंगांबाबत म्हणजेच चित्रपटाबाबत सांगितलं.

  मराठीसोबतच हिंदी, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये चमकलेली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे आता ‘जून’रंगी रंगलेली पहायला मिळणार आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत असलेला नेहाचा ‘जून’ हा मराठी चित्रपट ३० जून रोजी प्लॅनेट मराठीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं औचित्य साधत ‘नवराष्ट्र’शी संवाद साधताना नेहानं ‘जून’च्या अनोख्या रंगांबाबत म्हणजेच चित्रपटाबाबत सांगितलं.

  वास्तवात जून हा महिना नेहाच्या खूप आवडीचा आहे. हिरव्यागार निसर्गानं नटलेल्या या महिन्यासोबतच ‘जून’ या चित्रपटाबाबत नेहा म्हणाली की, जून महिना नवनिर्मितीचा आणि भरभराटीचा आहे. धरतीही हिरवीगार झालेली असते. पावसामुळं पॅाल्युशन, घाण, दुर्गंधी धुवून निघते. मान्सून एक चांगला आणि सकारात्मक मूड घेऊन येतो. त्यामुळं मान्सूनमध्ये लोकं खूप चांगल्या मूडमध्ये असतात. त्या पावसाकडं, त्या बदलांकडं, त्या ब्लॅासमकडं सतत पहात रहावं असं वाटतं. त्यामुळंच हा खूप सुंदर महिना असल्याचं मला वाटतं. याच महिन्यात फायनली ‘जून’ हा चित्रपटही रिलीज होत असल्याचा खूप आनंद आहे. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. कारण पोस्टर रिलील केल्यापासून ही फिल्म खूप वेगळी असल्याचं जाणवत होतं. यात मी वेगळ्या रूपात दिसतेय. सिद्धार्थ खूप निराळा दिसतोय. त्यामुळं सिनेमाबाबत कुतूहल खूप असल्यानं आणि फिल्म फेस्टिव्हल्समध्ये कौतुक झाल्यानं आता प्रेक्षकांच्या भेटीला येताना खूप आनंद होत आहे.

  ‘जून’ या टायटलबाबत विचारलं असता नेहा म्हणाली की, ‘जून’ हेच टायटल का दिलंय याचं उत्तर इथं सांगणं योग्य होणार नाही. चित्रपट पाहिल्यावर नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. हा एक ड्रामा आहे. हा चित्रपट दैनंदिन जीवनातील काही मुद्द्यांवर प्रखरपणे भाष्य करतो. दररोजच्या आयुष्यात आपण अशा बऱ्याच इश्यूजचा सामना करत असतो, जे बोलायला फार कम्फर्टेबल नाहीत. त्यामुळं त्याबाबत जास्त बोललं जात नाही. अशा इश्यूजना टार्गेट करत त्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. ही दोन अनोळखी व्यक्तींची स्टोरी आहे. एकमेकांना ओळखत नसतानाही ते कशाप्रकारे एक-दुसऱ्याला मदत करतात ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. मराठीमध्ये बऱ्याचदा एकसारखे विषय येत असल्याचं जाणवतं. रिजनल सिनेमा पाहताना मल्याळम, तमिळ, बंगाली चित्रपटांचा रेफ्रन्स पॅाइंट घेतो. कारण त्यांचे चित्रपट त्यांच्या संस्कृतीशी, प्रॅाब्लेमशी, रुटशी जोडले गेलेले आहेत. तसं आपणही आपल्या रुटशी केवळ एका कन्विनीयंट पॅाइंटपर्यंत जोडले गेलेलो आहोत. जिथे गोष्टी थोड्या अनकम्फर्टेबल होतात तिथे धजावत नाही. ज्या गोष्टींबद्दल बोलल्यानं संस्कृतीला, मानसिकतेला किंवा आपण जे ऐकत मोठे झालो त्या कल्पनेला धक्का बसेल अशाबद्दल खूप कमी बोललं जातं. हे मुद्दे युनिव्हर्सल आहेत. इतर भाषांमध्ये या विषयांबद्दल बोललं जातं, पण मराठीत याचं रिप्रेझेंटेशन झालेलं नसल्यानं ‘जून’ पहा.


  दोन नेहांमध्ये काहीच साम्य नाही
  या चित्रपटात मी जरी नेहा नावाचीच व्यक्तिरेखा साकारली असली, तरी रिअल लाईफमधील नेहा आणि रील लाईफमधील नेहामध्ये काहीच साम्य नाही. त्या दोघी कुठेही एकमेकींशी रिलेट करत नाहीत म्हणूनच ती खूप इंटरेस्टींग आहे. विवाहीत असलेली ही नेहा कोणत्या तरी गोष्टीच्या शोधात आहे. ती गोष्ट तिच्या नात्याकरता खूप महत्त्वाची आहे. कारण इतरही अनेक गोष्टी त्याच्याशी जोडलेल्या आहेत. या शोधात ती स्वत:चाही शोध घेते आणि एका अनोळखी व्यक्तीलाही मदत करून जाते. हे सगळं अनप्लॅनिंगली घडत जातं. त्यामुळं या चित्रपटातील नेहाला एका बाऊंड्रीमध्ये बांधणं योग्य ठरणार नाही. या फिल्ममध्ये ती एका मानसिक जर्नीमध्ये आहे.

  औरंगाबादमधील माणसांचं प्रतिनीधीत्व
  मराठी चित्रपटांमध्ये आजवर नेहमीच केवळ मुंबई आणि पुण्यालाच रिप्रेझेंट केलं गेलं आहे. या शहरांखेरीज महाराष्ट्रातील इतर शहरांना कधीच रिप्रेझेंटेशन मिळालेलं नाही. तिथली लोकं ना पूर्णपणे खेडेगावातील आहेत, ना मेट्रो सिटीतील… हे जे मधले आहेत त्यांचा पॅाइंट आॅफ व्ह्यू काय आहे? त्यांच्या समस्या काय आहेत? त्यांची घुसमट कुठे होतेय? या मुद्द्यांना हायलाईट करण्याचा प्रयत्न ‘जून’मध्ये करण्यात आला आहे. ‘जून’च्या माध्यमातून तिथल्या मानसिकतेला रिप्रेझेंटेशन मिळालेलं आहे. औरंगाबाद म्हटलं की, तिथलं निसर्गसौंदर्य आलंच. त्यामुळं तेसुद्धा या चित्रपटात पहायला मिळेलच. याहीपुढं जाऊन सांगायचं झालं तरी ही स्टोरी औरंगाबादमधील लोकांची असल्याचं मी म्हणेन.

  हिच चित्रपटाची ब्युटी…
  मी आणि सिद्धार्थ मेनन ही अनयुजव्हल पेअरींग आहे. ही निश्चितच रोमॅन्टिक पेअरींग नाही. ही दोन अनोळखी व्यक्तींची स्टोरी आहे, जे एकमेकांना मदत करतात. त्यामुळं या जोडीत कोणतंही रोझी नातं नाही. यांच्यात इमोशनल नातं आहे. दोघेही एका रिअॅलिटीमधून जात आहेत. त्याला कोणतंही गुलाबी पांघरूण न घालता कशाप्रकारे अत्यंत रॅा आणि रिअल पद्धतीनं ही दोन कॅरेक्टर्स एकमेकांसोबत डील करतात हे दाखवणं या चित्रपटाची ब्युटी आहे. सिद्धार्थ अत्यंत टॅलेंटेड कलाकार आहे. जेव्हा एका जाणकार कलाकारासोबत काम करायला मिळतं, तेव्हा आपल्या परफॅार्मंसवरही त्याचा चांगला परिणाम होतो. त्यांच्या इनपुटसमुळे तुमचा परफॅार्मंससुद्धा उठून दिसतो. त्यामुळं अशा कलाकारांसोबत काम करणं एखाद्या गौरवापेक्षा कमी नसतं.

  नवखेपणाचा कुठेही गंध नाही
  सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती या दोन नवोदित दिग्दर्शकांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दोघेही आपापल्या परीनं परीपूर्ण दिग्दर्शक आहेत. त्यांचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. त्यामुळंच कुठेतरी एक चांगली टीम जमून आली आहे. कुठेही टिपीकल मानसिकता किंवा काम करण्याची पद्धत नाही. काहीतरी वेगळं करण्याच्या हेतूनंच ते एकत्र आले आहेत. दोघांसोबत काम करताना कुठेही नवखेपणाची जाणीव झाली नाही. दोघांच्याही कामात पूर्णपणे पारदर्शकता आणि सतर्कता आहे. अशा सतर्क लोकांसोबत काम करताना स्वत:ला चॅलेंज करण्याची संधी मिळते. कारण आपण जे सतत पहात आलोय किंवा करत आलोय ते करण्याची आपली एक नॅचरल टेंडेंसी असते, पण अशा लोकांसोबेत काम करताना तुम्ही काहीतरी वेगळं करून जाता. हाच अनुभव दोघांसोबत मिळाला.

  भविष्याला आधार ओटीटीचाच
  ओटीटी हे ग्रेट प्लॅटफॅार्म आहे. थिएट्रीकल गणितं मराठीसाठी नेहमीच फलदायी नसतात. कारण आजही मराठी सिनेमांचा आवाका खूप लहान आहे. सारं काही अॅडजस्ट करताना निर्मात्यांच्या नाकी नऊ येतात. त्यामुळं एखादा कडक विषय, लिमिटेड बजेटमध्ये इफेक्टिव्हली मांडायचा असेल, तर ओटीटी हे प्रभावी आणि उत्तम माध्यम आहे. आज निव्वळ मराठी चित्रपटांसाठी प्लॅनेट मराठीसारखा प्लॅटफॅार्म तयार होणं ही खरंच सोन्याहून पिवळी गोष्ट आहे. प्लॅनेट मराठीसारख्या प्लॅटफॅार्मचा श्रीगणेशा या चित्रपटानं होत आहे हे ‘जून’चं चांगलं नशीब असल्याचं म्हणता येईल.