urmila kanetkar kothare

मराठी सिनेसृष्टीतील एक सोज्वळ, गुडीगुडी अभिनेत्री म्हणजे उर्मिला कानेटकर - कोठारे. (Urmila Kanetkar Interview) उर्मिलाने आपल्या कारकिर्दीमध्ये नेहमीच रोमॅण्टिक किंवा सोज्वळ भूमिका साकाराल्या. मात्र अलिकडेच तिने रानबाजार या वेबसीरिजमध्ये पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिका साकारली.  त्यानिमित्ताने उर्मिलाशी केलेली ही खास बातचीत....

  स्मिता मांजरेकर, मुंबई: ‘रानबाजार’चा (Ranbazar) अनुभव खूपच छान होता. या वेबसीरिजमधून मी अभिजीत पानसेसह पहिल्यांदा काम केलं आहे. त्यांनी या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. या वेबसीरिजच्या सगळ्या भागांना प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि आता अनेक भाषांमध्येसुध्दा ही वेबसीरिज येणार आहे. त्यामुळे खूपच आनंद वाटत आहे, अशी प्रतिक्रिया उर्मिला कानेटकरने (Urmila Kanetkar – Kothare) दिली आहे.

  नकारात्मक भूमिका साकारताना…
  उर्मिला पुढे सांगते की, मला अभिजीतने सुरुवातीपासूनच आत्मविश्वास दिला. तो म्हणाला होता की, काही बोल्ड दृश्य असतील तर ते सीन तुझ्या ‘कम्फर्ट झोन’मध्ये शूट करू. त्याबाबत तू काळजी करू नकोस. तसंच शूटिंग करताना सेटवर कुठेही अडखळलेपणा आला नाही. या बोल्ड दृश्यांमुळे अनेकांनी ट्रोल केलं. मात्र सुरुवातीलाच अभिजीतने या भूमिकांमागचे विचार माझ्यासमोर मांडले तेव्हा माझ्या भूमिकेबाबतीत तरी मला कुठेच त्यात गैर असं काहीच वाटलं नाही. तसंच एक अभिनेत्री म्हणून मला बरेच दिवस त्याच्यासह काम करायची इच्छा होती आणि या निमित्ताने तो योग जुळून आला. मला निगेटिव्ह शेडची भूमिका आजवर कोणी ऑफर केली नव्हती. माझा चेहरा पाहता कोणी तसा विचार करत नव्हतं. पण ती भूमिका अभिजीतला मला द्यावीशी वाटली हे नवल आहे आणि मला ही त्यानिमित्ताने काहीतरी वेगळं करता आलं. त्यामुळे मी या भूमिकाला होकार दिला…तसंच ‘रानबाजार‘सारखे विषय बिग स्क्रीनवरही यावेत. फक्त ही गोष्ट मोठी आहे. ती दोन तासात संपणारी नाही. त्याला दहा तास लागतील. त्यामुळे ती कथा वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्यासमोर आली. नाही तर ती मोठ्या पडद्यावरसुद्धा येऊ शकली असती.

  सकारात्मक आणि नकारात्मक भूमिकेबद्दल
  मला ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर जाऊन काम करायला आवडतं. त्यामुळे वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका मला करायला आवडतात. तसंच मी भूमिका स्विकारताना खूपच चूझी असते आणि आजवर मी साकारलेल्या सोज्वळ भूमिकांना रसिकांनी पसंती दिली तशीच पसंतीची दाद माझ्या निगेटिव्ह भूमिकांनाही मिळत आहे ते पाहून समाधान वाटत आहे, असं उर्मिला म्हणाली.

  ‘रानबाजार’चं रहस्य
  शेवटच्या भागामध्ये खूप काही सरप्राईजेस प्रेक्षकांना पाहायाला मिळणार आहेत. या वेबसीरिजमध्ये माझी भूमिका छोटी असल्यामुळे मी कमी दिवस सेटवर होते. त्यामुळे या सीरिजमध्ये पुढे काय बघायला मिळेल? हे जाणून घेण्यास मी देखील उत्सुक आहे.

  बोल्ड सीनबद्दल
  बोल्ड सीनबद्दल उर्मिला सांगते की, बोल्ड सीन करणं न करणं हा प्रत्येक कलावंतांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण काही जण मराठी आहे त्यामुळे बोल्ड सीन नाही करायचा असा पवित्रा घेतात. मात्र त्याचबरोबर त्यांना हिंदीत बोल्ड सीन असणं हे गैर वाटत नाही. मला ही भूमिका दुहेरी वाटते. बोल्ड सीनबाबत मला खूप आक्षेप नाही वाटतं. फक्त प्रेक्षकांनी आता आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. आज अनेक ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर अनेक बोल्ड वेबसीरिज दाखवण्यात येतात. या वेबसीरिज प्रेक्षक सर्रास पाहतात. त्याच्यात त्यांना आक्षेप नाही वाटत. पण मराठीत केला तर लगेच प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या जातात..का? प्रेक्षकांनी असा भेदभाव करू नये. अशा दुपट्टी विचारांमुळेच आपण मागे पडतो. मर्लिन मॅन्रोसह अनेक ह़ॉलिवूड कलावंताचे बोल्ड आणि बिनधास्त सीन पाहिले जातात. त्यांनी केलं तर चालतं, पण आपण केलेलं नाही चालत ही मानसिकता बदलायला हवी.. मला बोल्ड सीनच्या भूमिका ऑफर झाल्या तर मी सगळ्या गोष्टी बघेन. खरंच ती स्क्रिप्टची गरज आहे म्हणून केलं जातं आहे की, फक्त प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यासाठी हे केलं जात आहे. या सगळ्या बाबी मी तपासून घेईल.

  वेबसीरिजवर सेन्सॉर
  वेबसीरिजवर सेन्सॉर असावा. वेबसीरिजसाठी वयोगटाचे निकष आखले जावेत,असं उर्मिलाचं मत आहे.

  ‘रानबाजार’चं यश
  ही वेबसीरीज करतानाच जाणवलं होतं की, ती हिट होईल कारण सुरुवातीलाच जेव्हा कथा ऐकली तेव्हाच ती आश्वासक वाटली होती आणि ज्या पध्दतीने ती वेबसीरीज आकारायला येत होती ते पाहता एक चांगली सकारात्मकता पहिल्यापासूनच होती. ही वेबसीरीज प्रेक्षकांपर्यंत पोहचेल आणि त्यांना ती आवडेल अशी कुठेतरी मनात एक खात्री होती,असं उर्मिला म्हणाली.

  वेबसीरिजचं विश्व
  मनोरंजनासाठी वेबसीरीज हे खूप चांगलं दालन उपलब्ध झालं आहे. कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी ही नवी संधी आहे. या प्लॅटफॉर्मवरून वेगळे विषय मांडण्याची संधी मिळाली आहे. खरंतर बऱ्याचदा मराठीत अनेक विषय बॉक्स ऑफिसच्या गणितानुसार निवडले जातात. मराठीत हे चालणार नाही असं म्हूणन अनेक विषय बाजूला केले जातात. असे विषय आता वेबसीरिजच्या माध्यमातून पुढे येत आहेत. वेगवेगळे विषय हाताळण्यासठी हे माध्यम खूप चांगलं आहे, असं उर्मिलाचं मत आहे.

  भूमिकेची निवड करताना..
  भूमिकेची निवड करताना मी कधीच त्या भूमिकेची लांबी किती आहे याला महत्त्व देत नाही. याआधीही दिलं नाही आणि आताही देत नाही.माझ्या वाट्याला आलेली भूमिका त्या गोष्टीशी किती निगडीत आहे? आणि मला त्यात करण्यासारखं काय आहे? हे मी आवर्जून बघते. मला रंगभूमीवर काम करायला आवडेलं. मात्र अजून मला मनासारखी ऑफर मिळालेली नसल्याचं उर्मिलाचं म्हणणं आहे.

  आवडती वेबसीरिज
  अलिकडच्या काळात मला ‘पंचायत’ ही वेबसीरिज फार आवडली. त्या वेबसीरिजचा पहिला आणि दुसरा भागही आवडला. मला अशा हलक्या फुलक्या कथा बघायला आवडतात. ‘पंचायत’मधली कॉमेडी ही आपल्याला जुन्या काळातील ‘जबान सभांलके’ सारख्या सिरीअलची आठवण करून देतं. तसंच मुळात उत्तरप्रदेश म्हटलं की खूप सेक्स किंवा गँगवॉर हेच आपल्या डोळ्यासमोर येतो. पण ‘पंचायत‘ ही वेबसीरिज त्यापलिकडे जाऊन एक कॉमेडी पठडीतील कथा आपल्यासमोर घेऊन आली आहे. त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखा आणि त्याला साजेस संगीत मनाला खूप भिडतं, असं उर्मिलानं सांगितलं.

  ड्रिम रोल
  मी आजवर अनेक भूमिका साकारल्या. पण मला आता नृत्यावर आधारित भूमिका करायला आवडेल. क्लासिकल किंवा कथ्थकवर आधारित भूमिका करायला आवडेल किंवा एखादा बायोपिक करायलाही आवडेल. ती माझी इच्छा आहे. पण अजूनपर्यंत मला ती करायला मिळालेली नसल्याची खंत उर्मिलानं व्यक्त केली.