उर्मिला- आदिनाथच्या संसाराला लागलं ग्रहण? मुलीसोबत राहतेय वेगळी

आदिनाथ आणि उर्मिला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. हे कपल मराठी इंडस्ट्रीतलं 'क्यूट कपल' म्हणून ओळखलं जातं. मात्र आता त्यांच्या संसाराला जणू ग्रहण लागलं आहे.

    मराठी सिनेसृष्टीतील गोड आणि प्रसिद्ध जोडी आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर-कोठारे (Adinath & Urmila Kothare) सध्या चर्चेत आहेत. आदिनाथ त्याच्या नुकत्याच आलेल्या चित्रपटामुळेही चर्चेत आहे. त्याचं काम प्रेक्षकांना चांगलच पसंत पडलं आहे. मात्र आदिनाथ आणि उर्मिला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. हे कपल मराठी इंडस्ट्रीतलं ‘क्यूट कपल’ म्हणून ओळखलं जातं. दोघांच्या लग्नाला ११ वर्ष झाली आहेत,एक गोंडस ४ वर्षांची ‘जीजा’ नावाची मुलगीही त्यांना आहे. तसं पहायला गेलं तर काल-परवापर्यंत एक आयडियल फॅमिली, गोड कुटुंब असंच त्यांच्याबद्दल बोललं जायचं. दुधात मिठाचा खडा पडावा तसं या हसत्या-खेळत्या उर्मिला-आदिनाथच्या संसाराला कुणाची तरी नजर लागली असचं म्हणावं लागेल.

    मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून त्यांच्यात वैचारिक मतभेद सुरू आहेत अशी बातमी कानावर पडली होती. मात्र आता कळतं आहे की, गेल्या काही महिन्यांपासून उर्मिला ‘कोठारें’च्या घरातून बाहेर पडली असून मुलीसोबत वेगळी रहात आहे. पण ती आदिनाथ ज्या इमारतीत राहतो त्याच इमारतीतील दुसऱ्या घरात शिफ्ट झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यांच्या लहान मुलीला सध्या उर्मिला आणि आदिनाथचे आई-वडील सांभाळत आहेत असंही ऐकण्यात आलं आहे.

    सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार, उर्मिला-आदिनाथ मध्ये गेल्या दोन वर्षांपासून धुसफूस सुरु होती. पण कुटुंबामुळे अन् स्वतःभोवती असलेल्या प्रसिद्धिच्या वलयामुळे ते एकत्र असल्याचं भासवत होते. पण खरंतर जेव्हा ‘चंद्रमुखी’चं म्हणजेच आदिनाथ काम करीत असलेल्या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं तेव्हापासून सगळं बिघडत गेलं आहे. वैचारिक मतभेद तिथनंच सुरु झाले. घरातील वरिष्ठ यावर दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे उर्मिला आदिनाथच्या घरातनं बाहेर पडली असली त्याच इमारतीतील ‘कोठारे’ कुटुंबाच्या दुसऱ्या घरात मुलीसोबत शिफ्ट झाल्याचं कळत आहे.

    आदिनाथ-उर्मिलामध्ये खटके उडतायत,त्यांच्यात दुरावा आल्यात या बातम्यांना फूस मिळाली जेव्हा आदिनाथनं उर्मिलाच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाला ४ मे रोजी शुभेच्छा दिल्या नाहीत. त्याचबरोबर, आदिनाथच्या बिग बजेट, बिग सिनेमा असलेल्या चंद्रमुखीच्या प्रमोशनमध्ये उर्मिला कुठेच दिसली नाही तेव्हा. अन्यथा,अपेक्षा होती नृत्यात पारंगत असलेली उर्मिला चंद्रमुखीतील चंद्राची हुकअप स्टेप करताना नक्कीच रील व्हायरल करेल अन् आपल्या नवऱ्याच्या सिनेमाचं प्रमोशन करताना दिसेल. पण असं काही घडलं नाही. तसंच उर्मिलानं तब्बल १२ वर्षांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे तेही कोठारे व्हिजन या होम प्रॉडक्शनमधून नाही तर दुसऱ्याच प्रॉडक्शन हाऊसमधून. हे कारणही उर्मिला-आदिनाथ मध्ये बिनसल्याच्या बातमीला हवा देऊन गेलं.

    दोघांच्याही चाहत्यांना या बातमीने मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे या गोड जोडीमध्ये पुन्हा एकदा सगळंकाही अलबेल व्हावं अशीच सर्वांची इच्छा आहे.