‘जेएनयू’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर आलं समोर, रवी किशन आणि उर्वशी रौतेला यांचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी'च्या पोस्टरवर दाखवण्यात आलेला भारताचा नकाशा भगवा रंगाचा आहे. पोस्टरवर लिहिले आहे, 'एखादे शैक्षणिक विद्यापीठ देश तोडू शकते का?

  दिग्दर्शक विनय वर्मा यांनी त्यांच्या आगामी ‘JNU जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आज मंगळवार 12 मार्च रोजी रिलीज केलं.  चित्रपटाचं पोस्टर रिलीज होताच व्हायरल झालं आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर सोशल मीडिया यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या चित्रपटात उर्वशी रौतेला, सिद्धार्थ बोडके, पियुष मिश्रा, रश्मी देसाई, सोनाली सहगल, रवी किशन आणि विजय राज या कलाकारांसह अनेक स्टार्स मुख्य भूमिका साकारणार आहेत.

  चित्रपटाच्या पोस्टरवर भगवा रंगाचा नकाशा

  ‘JNU: जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’च्या पोस्टरवर दाखवण्यात आलेला भारताचा नकाशा भगवा रंगाचा आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे, ‘एखादे शैक्षणिक विद्यापीठ देश तोडू शकते का? पोस्टरमध्ये अनेकांचे हात दाखवण्यात आले आहेत. काही लोकांच्या हातात भगवा ध्वज आहे, ज्यावर जय श्री राम लिहिलेले आहे. त्याचबरोबर भारताचा भगवा नकाशाही एका हाताने धरलेला दाखवला आहे.

  उर्वशी रौतेलाने पोस्टर केलं शेअर

  चित्रपटाची मुख्य अभिनेत्री उर्वशी रौतेलानेही तिचे पोस्टर तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलं आहे. कॅप्शनमध्ये उर्वशीने लिहिले की, ‘शिक्षणाच्या बंद भिंतींच्या मागे देश तोडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. डावे आणि उजवे टक्कर होताच, वर्चस्वाची ही लढाई कोण जिंकणार? काही यूजर्स या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणत आहेत, तर काही यूजर्स हा चित्रपट पाहण्यासाठी उत्साह व्यक्त करत आहेत.

   चित्रपट कधी प्रदर्शित होणार

  ‘JNU: जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ हा चित्रपट महाकाल मुव्हीजच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनय शर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट यावर्षी 5 एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.