मनोरंजन सृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते राजा बापट काळाच्या पडद्याआड, ८५ वर्षी घेतला अखेरचा श्वास

राजा बापट यांनी अनेक अनेक सिनेमे, मालिका आणि नाटकांत आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.

    मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमधील जेष्ठ अभिनेते राजा (चंद्रकांत) बापट (Raja Bapat) यांचे हिंदुजा रुग्णालयात हृदयरोगाने निधन झाले. वयाच्या ८५ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर सोमवारी दुपारी शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा, मुलगी शिल्पा (गौरी) व जावई गिरीश म्हसकर आणि नातवंडे असा परिवार आहे.

    राजा बापट यांनी अनेक अनेक सिनेमे, मालिका आणि नाटकांत आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.

    राजा बापट यांनी बालकलाकार म्हणून मनोरंजसृष्टीत पाऊल ठेवलं. नाटककार रत्नाकर मतकरी (Ratnakar Matkari) यांच्या बालनाट्य संस्थेतून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. ‘रंगायन’ या संस्थेमार्फत त्यांची रंगभूमीशी ओळख झाली. ‘यशोदा’ (Yashoda), ‘श्रीमंत’, ‘हमीदाबाईची कोठी'(Hamidabaichi Kothi), ‘पप्पा सांगा कुणाचे’ (Pappa Saanga Kunache), ‘शांतुतल’ (Shaakuntal), ‘सागर माझा प्राण’, ‘जन्मदाता’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’ (Shantata! Court Chalu Aahe) अशा अनेक गाजलेल्या नाटकांत राजा बापट यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

    ‘दामिनी’ (Damini), ‘वादळवाट’ (Vadalvaat), ‘या सुखांनो या’, ‘झुंज’, ‘समांतर’, ‘बंदिनी’, ‘वहिनीसाहेब’, ‘या गोजिरवाण्या घरात’ (Hya Gojirwanya Gharat), ‘मनस्विनी’, ‘अग्निहोत्र’, ‘श्रावणबाळ रॉकस्टार’ आणि ‘आम्ही दोघं राजा राणी’ अशा अनेक मालिकांमध्ये राजा बापट यांनी काम केलं आहे.