विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक; दीनानाथ रुग्णालयाची माहिती

विक्रम गोखले यांच्यावर ५ नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत थोडी बरी झाली होती, पण पुन्हा त्यांची तब्येत खालावली. त्यांना हृदय आणि किडनी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागले, असे वृषाली यांनी सांगितले. ३० ऑक्टोबरला विक्रम गोखले यांनी त्यांचा ८२ वा वाढदिवस साजरा केला.

    पुणे – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची प्रकृती चिंताजनक (Condition Is Alarming) आहे. डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती दीनानाथ रुग्णालयाकडून (Dinanath Hospital) देण्यात आली आहे. रात्री विक्रम गोखले यांच्या मुलीने एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर असून ते लाइफ सपोर्टवर (Life Support) आहेत. त्याच्यासाठी प्रार्थना करत राहा. तर, पत्नी वृषाली गोखले यांनीही ते काल कोमामध्ये (Coma) गेले होते. त्यानंतर त्यांनी काहीही रिस्पॉन्स दिलेला नाही, असे सांगितले.

    विक्रम गोखले यांच्यावर ५ नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत थोडी बरी झाली होती, पण पुन्हा त्यांची तब्येत खालावली. त्यांना हृदय आणि किडनी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागले, असे वृषाली यांनी सांगितले. ३० ऑक्टोबरला विक्रम गोखले यांनी त्यांचा ८२ वा वाढदिवस साजरा केला. विक्रम गोखले यांनी विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

    काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोदावरी या चित्रपटामध्ये देखील विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली. तर, अग्निपथ, अकेला, ईश्वर, हम दिल दे चुके सनम, घर आया मेरा परदेसी या हिट हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले असून नटसम्राट, माहेरची साडी, लपंडाव, वजीर यांसह अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.